अकलूजच्या सुपुत्रावर भाजपमध्ये मोठी जबाबदारी

महर्षि डिजीटल न्यूज | सागर खरात
अकलूज : भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश अनुसूचित जाती मोर्चाच्या प्रदेश कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली आहे. भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या सूचनेनुसार करण्यात आलेल्या या नियुक्त्यांमध्ये अकलूज येथील सूरज ज्ञानोबा म्हस्के यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
अनुसूचित जाती मोर्चाच्या प्रदेश कार्यकारिणीत सूरज म्हस्के यांची प्रदेश सचिव तसेच सहसंपर्क प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. आ. माधवी नाईक, प्रदेश महामंत्री व प्रभारी, अनुसूचित जाती मोर्चा तसेच विश्वजीत गायकवाड, अध्यक्ष, अनुसूचित जाती मोर्चा, महाराष्ट्र प्रदेश यांच्या माध्यमातून ही प्रदेश कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.
सूरज म्हस्के यांच्यावर पक्षाने सोपविलेल्या या दुहेरी जबाबदारीमुळे अकलूजसह माळशिरस तालुक्यातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. अनुसूचित जाती समाजाच्या संघटनात्मक बांधणीसह पक्षाचे विचार आणि धोरणे समाजाच्या विविध घटकांपर्यंत पोहोचविण्याची महत्त्वाची जबाबदारी आता त्यांच्या खांद्यावर असणार आहे.
अकलूजच्या स्थानिक राजकारणातून प्रदेश पातळीवर महत्त्वाची जबाबदारी मिळाल्याने सूरज म्हस्के यांच्या राजकीय वाटचालीतील हा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.



