महर्षि डिजीटल न्यूज चा जबरदस्त दणका ; तालुक्यातील सर्व गौण खनिज उत्खननाचे होणार पंचनामे

महर्षि डिजीटल न्यूज | सागर खरात
अकलूज : महर्षि डिजीटल न्यूजने सातत्याने या गंभीर प्रश्नाला वाचा फोडल्यानंतर माळशिरस तालुक्यात सुरू असलेल्या अवैध गौण खनिज उत्खननाच्या प्रकरणाची महसूल प्रशासनाने अखेर गांभीर्याने दखल घेतल्याचे सध्यातरी दिसून येत आहे. तालुक्यातील विविध ठिकाणी सुरू असलेल्या तसेच यापूर्वी उत्खनन झालेल्या जागांना प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी व पंचनामे करण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली असल्याची खात्रीशीर माहिती मिळत आहे.
महर्षि डिजीटल न्यूजच्या वृत्तमालिकेतून माळशिरस तालुक्यातील विविध भागांतील कथित अवैध उत्खनन, मोठमोठ्या खाणी, मुरूम-दगड-खडीची वाहतूक आणि प्रशासनाच्या कारवाईबाबत सातत्याने प्रश्न उपस्थित करण्यात आले. या वृत्तमालिकेनंतर महसूल प्रशासनाच्या हालचालींना वेग आल्याचे दिसत असून, विविध उत्खननस्थळांची माहिती घेण्यास सुरुवात झाली आहे.
महर्षि डिजीटल न्यूज च्या वृत्तमालिकेची दखल घेऊन महसूल प्रशासनाने हालचाली सुरू केल्याने कथित अवैध उत्खनन करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाल्याची चर्चा तालुक्यात सुरू आहे. मात्र, आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे ही कारवाई केवळ पाहणी, पंचनामा आणि कागदोपत्री नोंदींपुरतीच मर्यादित राहणार का? की नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर प्रत्यक्षात कठोर दंडात्मक कारवाई होणार?
कारण, यापूर्वीही काही ठिकाणी पंचनामे करून मोठ्या रकमेचे दंड ठोठावण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, त्यानंतरही काही ठिकाणी उत्खनन सुरू असल्याच्या तक्रारी होत असतील, तर केवळ दंडाची नोटीस देऊन प्रशासनाची जबाबदारी संपत नसल्याचा आरोप सर्वसामान्यातून केला जात आहे.
अवैध उत्खननाचा प्रश्न केवळ एका गावापुरता किंवा एका उत्खननस्थळापुरता मर्यादित नसून माळशिरस तालुक्यातील अनेक भागांत मुरूम, दगड आणि खडीच्या कथित अवैध उत्खननाबाबत सातत्याने तक्रारी समोर येत आहेत. त्यामुळे कारवाईची व्याप्ती केवळ तक्रार प्राप्त झालेल्या ठिकाणांपुरती न ठेवता संपूर्ण तालुक्यातील संशयित उत्खननस्थळांची सखोल तपासणी करण्याची गरज व्यक्त होत आहे.
पंचनाम्यात नेमके किती गौण खनिजाचे उत्खनन झाले आहे, शासनाचा किती महसूल बुडाला आहे, किती दंड आकारण्यात येणार आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आकारलेला दंड प्रत्यक्षात वसूल होणार का? या प्रश्नांची उत्तरे आता प्रशासनाला आता द्यावी लागणार आहेत.
नागरिकांच्या मते, केवळ दंड ठोठावून प्रश्न सुटणार नाही. दंडाची प्रभावी वसुली, पुन्हा उत्खनन होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई झाली तरच या मोहिमेला खरा अर्थ प्राप्त होईल.
महर्षि डिजीटल न्यूजच्या सातत्यपूर्ण वृत्तमालिकेमुळे प्रशासनाने हालचाली सुरू केल्या असल्या तरी ही कारवाई तात्पुरती मलमपट्टी ठरू नये, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे. महसूल प्रशासनाने या संपूर्ण प्रकरणाची मुळापासून चौकशी करून, तालुक्यात सुरू असलेल्या कथित अवैध गौण खनिजांच्या लुटीला कायमस्वरूपी आळा घालावा, अशी मागणी आता जोर धरत आहे.
आता महसूल प्रशासनाच्या पाहणी आणि पंचनाम्यांमध्ये नेमके काय निष्पन्न होते, किती ठिकाणी अनियमितता आढळते, किती गौण खनिज उत्खननाची नोंद होते, किती दंड आकारला जातो आणि संबंधितांवर प्रत्यक्षात कोणती कठोर कारवाई होते, याकडे संपूर्ण माळशिरस तालुक्याचे लक्ष लागले आहे.



