साखर फक्त 25 रुपये किलो! पांडुरंग कारखान्याचा मोठा निर्णय; सोमवारपासून विक्री सुरू

महर्षि डिजीटल न्यूज | सागर खरात
अकलूज : सध्या खुल्या बाजारपेठेत साखरेचे किरकोळ दर प्रति किलो ७० ते ७५ रुपयांच्या वर पोहोचले असून महागाईमुळे सर्वसामान्यांचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. वाढत्या महागाईच्या या काळात कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखाना लि., श्रीपूर यांनी आपल्या शेतकरी सभासदांना मोठा दिलासा दिला आहे. कारखान्याचे चेअरमन प्रशांत परिचारक यांनी सभासदांसाठी अवघ्या २५ रुपये प्रति किलो या अत्यंत सवलतीच्या आणि अतुलनीय दरात दर्जेदार साखर उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला असून, या निर्णयाचे शेतकरी वर्गातून जोरदार स्वागत होत आहे.
बाजारपेठेत साखरेच्या दरात सातत्याने वाढ होत असताना सभासदांच्या कुटुंबावरील आर्थिक ताण कमी व्हावा आणि त्यांना दर्जेदार साखर माफक दरात मिळावी, या उद्देशाने हे साखर वाटप सुरू करण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत सोमवार, दिनांक ३१ ऑगस्ट २०२६ पासून प्रत्यक्ष साखर वाटपास प्रारंभ होणार आहे. सभासदांची गैरसोय टाळण्यासाठी कारखान्याच्या कार्यस्थळावरील मुख्य साखर विक्री केंद्रासोबतच पंढरपूरमधील वाखरी येथील शाखेतूनही ही साखर उपलब्ध करून दिली जाणार असल्याची माहिती कार्यकारी संचालक डॉ. यशवंत कुलकर्णी यांनी दिली.
सदर सवलतीचे वाटप केवळ कारखान्याच्या अधिकृत सभासदांसाठीच असल्याने साखर घेण्यासाठी येताना सर्व सभासदांनी आपले अधिकृत ओळखपत्र सोबत आणणे अनिवार्य करण्यात आले आहे. बाजारात साखरेचे दर गगनाला भिडलेले असताना ‘पांडुरंग सहकार… सभासदांचा आधार’ हे ब्रीद प्रत्यक्षात उतरवत कारखान्याने घेतलेला हा निर्णय कौतुकास्पद ठरला असून यामुळे शेतकरी सभासदांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.



