नातेपुतेत FDA ची मोठी कारवाई! ५३ हजारांचा पॅकेज्ड पाणी व मँगो ज्यूसचा साठा जप्त; उत्पादन युनिटला तात्काळ व्यवसाय बंद करण्याचे आदेश

महर्षि डिजीटल न्यूज | सागर खरात
नातेपुते (ता. माळशिरस) : अन्न व औषध प्रशासनाने नातेपुते येथील एका पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटर व मँगो ज्यूस उत्पादन करणाऱ्या कंपनीवर धडक कारवाई करत सुमारे ५३ हजार रुपये किमतीचा १,३८४ लिटर अन्नसाठा जप्त केला आहे. तसेच तपासणीत आढळलेल्या त्रुटी दूर होईपर्यंत संबंधित आस्थापनेला तात्काळ व्यवसाय बंद करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
अन्न व औषध प्रशासन, सोलापूर कार्यालयाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे १८ जुलै २०२६ रोजी अन्न सुरक्षा अधिकारी मंगेश म. लवटे आणि सहायक अन्न सुरक्षा अधिकारी रमाकांत पाटील यांनी मे. सत्यवेल अॅग्रोटेक प्रा. लि., नातेपुते (ता. माळशिरस) येथे अचानक तपासणी केली.
या तपासणीदरम्यान पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटर आणि मँगो ज्यूसचे प्रत्येकी एक असे एकूण दोन नमुने तपासणीसाठी घेण्यात आले. तसेच उर्वरित ५८४ लिटर पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटर आणि ८०० लिटर मँगो ज्यूस, असा एकूण १,३८४ लिटर साठा (किंमत सुमारे ५३ हजार रुपये) लेबलवरील त्रुटी, कमी दर्जाचा संशय आणि अन्न सुरक्षा व मानके कायदा तसेच परिशिष्ट-४ (Schedule IV) मधील नियमांचे उल्लंघन झाल्याचा संशय आल्याने जप्त करण्यात आला.
जप्त करण्यात आलेला साठा पुढील आदेशापर्यंत संबंधित आस्थापनातच सुरक्षित ठेवण्यात आला असून, तपासणीत निदर्शनास आलेल्या त्रुटींची पूर्तता होईपर्यंत संबंधित कंपनीला तात्काळ व्यवसाय बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
ही कारवाई अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे आणि सहआयुक्त (पुणे विभाग) दि. वा. भोगावडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त (अन्न) सी. ए. देसाई, अन्न सुरक्षा अधिकारी मंगेश म. लवटे आणि सहायक अन्न सुरक्षा अधिकारी रमाकांत पाटील यांच्या पथकाने केली.
अन्न व औषध प्रशासनाने ग्राहकांच्या आरोग्याशी तडजोड करणाऱ्या अन्न व्यवसायिकांविरुद्ध अशा प्रकारच्या कारवाया पुढेही सुरू राहणार असल्याचा इशारा दिला आहे.



