Uncategorized

अकलूजमध्ये रविवारी सामाजिक ऐक्य परिषद; खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या हस्ते होणार उद्घाटन

महर्षि डिजीटल न्यूज | सागर खरात 

अकलूज : बहुजन सत्यशोधक संघाच्या वतीने रविवार, दि. १८ ऑक्टोबर २०२६ रोजी अकलूज येथे सामाजिक ऐक्य परिषद व कृतज्ञता पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी ४ वाजता नवीन एस.टी. स्टँडजवळील आई श्री रिसॉर्ट येथे हा कार्यक्रम होणार आहे. सामाजिक सलोखा, समता, बंधुता आणि संविधानिक मूल्यांचा प्रसार करण्यासोबतच विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींच्या योगदानाची दखल घेऊन त्यांचा गौरव करणे, हा या परिषदेचा प्रमुख उद्देश आहे.

या परिषदेचे उद्घाटन माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या हस्ते होणार असून, बहुजन सत्यशोधक संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष सुनील ओहोळ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असणार आहेत. या सोहळ्यास सांगोला विधानसभा मतदारसंघाचे आमदार बाबासाहेब देशमुख, माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार अभिजित पाटील, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्वीय सहाय्यक राहुलजी वाघमोडे, नामांकित हृदयरोगतज्ज्ञ डॉ. एम. के. इनामदार, अखिल भारतीय होलार समाज संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष व आरपीआयचे राज्य संघटक नंदकुमार कांगार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) गटाचे राज्य उपाध्यक्ष प्रशांत बाबर, संत सावता माळी महाराजांचे वंशज रमेश महाराज वसेकर, बहुजन सत्यशोधक संघाचे राष्ट्रीय सचिव डॉ. अमीर मुलाणी आणि राजमाता अहिल्याबाई होळकर संस्थान, इंदूरचे व्यवस्थापक आदित्य फत्तेपुरकर उपस्थित राहणार आहेत.

समाजातील विविध जाती-धर्मांमध्ये ऐक्य आणि सलोखा निर्माण करणे, सामाजिक विषमतेविरोधात जनजागृती करणे, संविधानिक मूल्यांचा प्रसार करणे आणि समाजहितासाठी कार्य करणाऱ्या व्यक्तींना प्रोत्साहन देणे, या उद्देशाने परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि धार्मिक क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या मान्यवरांना यावेळी कृतज्ञता पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात येणार आहे. समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय या मूल्यांच्या आधारे समाजात परस्पर आदराची भावना वाढीस लागावी, तसेच सामाजिक प्रश्नांवर सकारात्मक विचारमंथन व्हावे, या दृष्टीने या परिषदेचे आयोजन करण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले.

कार्यक्रमाच्या आयोजनात बहुजन सत्यशोधक संघाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सौरभ वाघमारे, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष राजकुमार लांडगे, महाराष्ट्र कार्याध्यक्ष हेमंत कांबळे, प्रवक्ते महेंद्र लंकेश्वर, डॉ. विश्वास वाघमारे, जिल्हाध्यक्ष बापूसाहेब लोंढे, तालुकाध्यक्ष विनोद लोखंडे, युवक जिल्हाध्यक्ष अवि गायकवाड, युवा उपाध्यक्ष पांडुरंग चव्हाण, तालुका सचिव रवींद्र काकडे, तालुका उपाध्यक्ष महमद शेख, अकलूज शहराध्यक्ष अशोक कोळी, युवा जिल्हा उपाध्यक्ष सावता नवगिरे आणि तालुका संपर्कप्रमुख रोहिदास तोरणे यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी, सदस्य व कार्यकर्ते सहभागी आहेत. या सामाजिक ऐक्य परिषद व कृतज्ञता पुरस्कार वितरण सोहळ्यास नागरिक, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते आणि सर्व समाजबांधवांनी उपस्थित राहावे, असे आवाहन बहुजन सत्यशोधक संघाच्या वतीने करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button