आंघोळीचा व्हिडिओ काढून ब्लॅकमेल, दोन वर्षे अत्याचार | गिरझणीत धक्कादायक प्रकार, एक जण अटकेत

महर्षि डिजीटल न्यूज | सागर खरात
अकलूज (ता. माळशिरस, जि. सोलापूर) : महिलांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करणारी धक्कादायक घटना अकलूज परिसरात (गिरझणी येथे) उघडकीस आली आहे. आंघोळ करत असताना महिलेचा गुपचूप व्हिडिओ काढून तो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत तब्बल दोन वर्षे अत्याचार केल्याप्रकरणी गिरझणी येथील उमेश जगन्नाथ साठे यास अकलूज पोलिसांनी अटक केली आहे.
पीडित महिला व तिच्या पतीने दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी उमेश साठे हा विकास सोसायटीत कर्मचारी म्हणून कार्यरत होता. महिलेने दिलेल्या जबाबात नमूद केल्याप्रमाणे, ती आंघोळ करत असताना आरोपीने मोबाईलमध्ये तिचा व्हिडिओ चित्रित केला. त्यानंतर हा व्हिडिओ सोशल मीडियावर टाकण्याची धमकी देत आरोपीने महिलेवर बळजबरीने शारीरिक संबंध ठेवले.
ही बाब एकदाच मर्यादित न राहता, आरोपीने वेळोवेळी महिलेचे व्हिडिओ काढत तिला ब्लॅकमेल केले आणि तिच्यावर अत्याचार सुरूच ठेवले. दरम्यान, पीडितेच्या पतीला संशय आल्याने त्याने पत्नीशी चर्चा केली असता संपूर्ण प्रकार उघड झाला. त्यानंतर त्वरित अकलूज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.
तक्रारीनंतर पोलिसांनी उमेश साठे यास ताब्यात घेतले असून त्याच्या मोबाईलमध्ये अनेक अश्लील व्हिडिओ आढळून आल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सुधीर टिंगले यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
याचबरोबर, आरोपी हा ग्रामपंचायतमध्ये कायमस्वरूपी कर्मचारी असतानाही विविध कार्यकारी सोसायटीत देखील काम करत होता, अशी माहिती समोर आली आहे. त्यामुळे एकाच वेळी दोन ठिकाणी नोकरी करून दोन्ही ठिकाणचा पगार घेतला जात होता का, याबाबतही प्रश्न उपस्थित होत असून याचीही चौकशी होण्याची शक्यता आहे.
या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून महिलांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे.



