बनावट कागदपत्रांवर श्रीमंतांची घुसखोरी ; माळशिरस तालुक्यात RTE प्रवेशात घोटाळा झाल्याची चर्चा

महर्षि डिजीटल न्यूज | सागर खरात
अकलूज : गोरगरीब आणि गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी वरदान ठरलेल्या ‘मोफत शिक्षण हक्क कायद्या’ला (RTE) माळशिरस तालुक्यात भ्रष्टाचाराची वाळवी लागल्याचे धक्कादायक वास्तव समोर येत आहे. ‘शिक्षण हक्क’ केवळ कागदावरच उरला असून, धनदांडग्यांनी बनावट कागदपत्रांच्या जोरावर गरिबांच्या हक्काच्या जागा बळकावल्याची जोरदार चर्चा आता तालुक्यात रंगली आहे. या गंभीर प्रकारामुळे प्रामाणिक आणि गरजू पालकांमध्ये संतापाची लाट असून, शिक्षण विभाग याकडे डोळेझाक का करत आहे? असा जळजळीत सवाल विचारला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अनेक अर्जांमध्ये बनावट पत्ते, खोटे भाडेकरार (Rent Agreement) आणि शाळेजवळ वास्तव्यास असल्याचे खोटे दाखवून प्रवेश मिळवण्यात आला आहे. विशेष म्हणजे, काही प्रकरणांत २५ ते ३० किलोमीटर अंतरावर राहणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला, तर स्थानिक खऱ्या अर्थाने पात्र असलेल्या गरीब विद्यार्थ्यांना डावलण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
यापेक्षाही गंभीर बाब म्हणजे, काही ठिकाणी घरमालकांना १० ते १५ हजार रुपये देऊन खोटे भाडेकरार तयार करण्यात आल्याची चर्चा आहे. “भाड्याने राहत असल्याचे दाखवून” नियमांना बगल देण्यात आल्याचे आरोप होत असून यामुळे संपूर्ण प्रवेश प्रक्रियेवर संशयाचे सावट निर्माण झाले आहे.
स्थानिक नागरिक व पालकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून, “गरिबांच्या हक्कावर डाका टाकणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी” अशी मागणी जोर धरत आहे. शिक्षण विभागाने या प्रकरणाची तातडीने सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, तसेच पात्र विद्यार्थ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी सर्वसामान्यांकडून होत आहे.
दरम्यान, या प्रकरणामुळे शिक्षण विभागाच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, “खरे लाभार्थी कोण?” हा सवाल आता अधिकच तीव्र झाला आहे. प्रशासन यावर काय भूमिका घेते आणि दोषींवर कोणती कारवाई होते, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.



