Latest News

खा.धैर्यशील मोहिते पाटील यांच्या कन्येच्या शेतासह 43 शेतकऱ्यांच्या शेतातील केबल चोरी | बळीराजा हवालदिल 

महर्षि डिजीटल न्यूज | सागर खरात 

अकलूज : माळशिरस तालुक्यातील आनंदनगर परिसरात केबल चोरांनी अक्षरशः धुमाकूळ घातला असून, एकाच रात्रीत ४० पेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या पाणबुडी मोटारींच्या केबल्स लंपास केल्या आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, या चोरीच्या सत्रातून खुद्द खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या कन्या कुमारी इशिता धैर्यशील मोहिते पाटील यांचेही शेत सुटले नाही. या धाडसी चोरीमुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली असून, पोलिसांच्या गस्तीवर आणि कार्यक्षमतेवर आता गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नीरा नदीकाठावर वसलेल्या आनंदनगर भागातील शेतकऱ्यांनी पिकांच्या पाण्यासाठी नदीपात्रात पाणबुडी मोटारी बसवल्या आहेत. ३० मार्चच्या रात्री अज्ञात चोरट्यांनी एकापाठोपाठ एक अशा ४० हून अधिक शेतकऱ्यांच्या तांब्याच्या (कॉपर) केबल्स कापून नेल्या. यामध्ये हेमंत किसन चव्हाण, शिवाजी रामचंद्र सावंत यांच्यासह ४० शेतकऱ्यांच्या सुमारे १४ हजार रुपये प्रति शेतकरी याप्रमाणे लाखो रुपयांच्या केबल्स चोरीला गेल्या आहेत.

या चोरीचा फटका बसलेल्यांमध्ये इशिता धैर्यशील मोहिते पाटील, हेमंत चव्हाण, शिवाजी सावंत, सुनील सावंत, शिवाजी पवार, गंगाधर चव्हाण, संजय चव्हाण, विठ्ठल शेळमकर, सर्जेराव चव्हाण, महादेव जरे, पप्पू चव्हाण, राहुल सावंत, पांडुरंग रेवंडे, रतन चव्हाण, दत्तात्रय शेळमकर, गणपत शेळमकर, सदाशिव शेळमकर, सौरभ इंगळे, विशाल दहिवाळ, पांडुरंग यादव, शंकर शिंदे, विनोद जगताप, रघुनाथ चव्हाण, पांडुरंग जरे, मधुकर जरे, हनुमंत जरे, नामदेव जरे, बंडू देसाई, वसंत बांर्दुगे, अशोक शेळमकर, सलीम तांबोळी, बलभीम चव्हाण, रवींद्र काटकर, स्वप्नाली इंगोले, बाळासाहेब शेळमकर, सोमनाथ शेळमकर, लक्ष्मण शेळमकर, सुभाष डांगरे आणि मनोहर इनामदार यांसह अनेक शेतकऱ्यांचा समावेश आहे.

एकाच रात्रीत, एकाच परिसरातून इतक्या मोठ्या प्रमाणावर चोरी होणे, हे पोलिसांच्या यंत्रणेचे मोठे अपयश मानले जात आहे. खासदारांच्या कन्येच्या शेतातही चोरी करण्याचे धाडस चोरटे दाखवत असतील, तर सर्वसामान्यांचे काय? असा संतप्त सवाल आता शेतकरी विचारत आहेत. याप्रकरणी अकलूज पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २१०/२०२६ अन्वये BNS कलम ३०३(२) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस हेड कॉन्स्टेबल सुहास शिरसागर तपास करत आहेत.

उन्हाळ्याचा तडाखा वाढत असताना आणि पिकांना पाण्याची नितांत गरज असतानाच केबल चोरीला गेल्याने शेतीचे अर्थचक्र थांबले आहे. केबल पुन्हा विकत घेण्यासाठी लागणारा खर्च आणि तोपर्यंत पाणी न मिळाल्यास पिके जळण्याची भीती, अशा दुहेरी संकटात बळीराजा सापडला आहे.

 “जर पोलिसांनी तातडीने या टोळीचा छडा लावून चोरीचा माल हस्तगत केला नाही, तर आम्ही रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडू,” असा इशारा संतप्त शेतकऱ्यांनी दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!