₹3,591 कोटींचा नीरा देवघर प्रकल्प रखडला, PIB बैठकच नाही, मंजुरी कधी? ; खा.धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रश्नाला सरकारचे उत्तर

महर्षि डिजीटल न्यूज | सागर खरात
अकलूज : माढा लोकसभा मतदारसंघातील अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा नीरा देवघर सिंचन प्रकल्प सध्या मंजुरीअभावी रखडल्याचे स्पष्ट झाले आहे. लोकसभेत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना केंद्र सरकारने याबाबतची माहिती दिली.
खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी हा मुद्दा संसदेत उपस्थित केला होता. त्यांनी प्रकल्पाच्या आर्थिक मंजुरीसाठी सार्वजनिक गुंतवणूक मंडळ (PIB) बैठकीबाबत प्रश्न उपस्थित केले होते.
केंद्र सरकारने दिलेल्या उत्तरानुसार, सुमारे ₹3,591.46 कोटी खर्चाचा प्रस्ताव PIB कडे सादर करण्यात आला आहे. हा प्रकल्प प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना (PMKSY-AIBP) अंतर्गत समाविष्ट करण्यासाठी पाठवण्यात आला आहे.
मात्र, या प्रकल्पासाठी 7 जून 2024 रोजी नियोजित PIB बैठक पुढे ढकलण्यात आली असून, अद्याप नवीन तारीख निश्चित करण्यात आलेली नाही. त्यामुळे प्रकल्पाची मंजुरी लांबणीवर पडली आहे.
दरम्यान, दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांसाठी हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. सिंचनाची सुविधा मिळाल्यास हजारो हेक्टर शेतीला पाणी मिळणार आहे. मात्र, केंद्रस्तरावर निर्णयात होत असलेल्या विलंबामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी वाढत आहे.
आता PIB कडून प्रकल्पाचे मूल्यमापन आणि शिफारस झाल्यानंतरच पुढील निर्णय होणार असल्याने, या प्रकल्पाच्या भवितव्याबाबत अनिश्चितता कायम आहे.



