बांधकाम कामगारांच्या कल्याणासाठी ‘माळशिरस पॅटर्न’; आ. उत्तमराव जानकर यांच्या अध्यक्षतेखाली शासकीय समिती गठीत!

महर्षि डिजीटल न्यूज | सागर खरात
अकलूज : माळशिरस विधानसभा मतदारसंघातील हजारो बांधकाम कामगारांच्या आयुष्यात आता सुवर्णकाळ येण्याची चिन्हे आहेत. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ, मुंबई यांच्या आदेशानुसार, या मतदारसंघासाठी ‘बांधकाम कामगार स्थानिक सल्लागार शासकीय समिती’ अधिकृतपणे स्थापन करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, या समितीच्या अध्यक्षपदाची धुरा माळशिरसचे कार्यक्षम आमदार उत्तमराव शिवदास जानकर यांच्याकडे सोपवण्यात आली असून, २३ मार्च २०२६ रोजी जिल्हा कार्यालयाकडून याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.
योजनांचा लाभ थेट कामगारांच्या दारात!
उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभागाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार ही समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीचा मुख्य उद्देश बांधकाम कामगारांच्या कल्याणासाठी असलेल्या शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणे, कामगारांच्या तक्रारींचे निवारण करणे आणि प्रशासनासोबत समन्वय साधून शेवटच्या घटकापर्यंत लाभ पोहोचवणे हा आहे.
अशी आहे नवनिर्वाचित समिती:
आमदार उत्तमराव जानकर यांच्या नेतृत्वाखालील या समितीत विविध क्षेत्रांतील प्रतिनिधींची नियुक्ती करण्यात आली आहे:
अध्यक्ष: आमदार उत्तमराव शिवदास जानकर
कामगार प्रतिनिधी (पुरुष): सुधीर हनुमंत पवार, विकास संदीपन धाईंजे
कामगार प्रतिनिधी (महिला): वर्षा बलभीम रसाळ, शमशाद बेगम अकबर शिकलगर
मालक प्रतिनिधी: शिवराज जगथीश निंबाळकर, रणजित दिगंबर सातपुते
सदस्य सचिव: सहाय्यक कामगार आयुक्त / सरकारी कामगार अधिकारी
(टीप: सहअध्यक्ष पदाबाबत स्वतंत्र आदेश लवकरच निर्गमित करण्यात येणार आहेत.)
समितीच्या कामाचे स्वरूप आणि फायदे:
या समितीच्या माध्यमातून माळशिरस तालुक्यातील बांधकाम कामगारांना खालील लाभ मिळवून देण्यासाठी प्राधान्य दिले जाणार आहे:
१. नोंदणी मोहीम: जास्तीत जास्त कामगारांची अधिकृत नोंदणी करून त्यांना ओळखपत्र मिळवून देणे.
२. आर्थिक व सामाजिक सुरक्षा: आरोग्य सहाय्य, अपघात विमा मदत, पाल्यांच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्ती आणि विवाह साहाय्य योजनांचा लाभ मिळवून देणे.
३. समस्यांचे निराकरण: कामगारांच्या कामाच्या ठिकाणच्या अडचणी थेट शासनापर्यंत पोहोचवून त्या सोडवणे.
४. जनजागृती: शासनाच्या विविध क्लिष्ट योजना सोप्या भाषेत कामगारांपर्यंत पोहोचवणे.
कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण
आमदार उत्तमराव जानकर यांच्यासारख्या आक्रमक आणि अभ्यासू नेतृत्वाकडे या समितीचे अध्यक्षपद आल्याने, माळशिरस मतदारसंघातील हजारो नोंदणीकृत आणि असंघटित कामगारांमध्ये मोठ्या अपेक्षा निर्माण झाल्या आहेत. आता सरकारी योजनांचा लाभ घेताना होणारी दप्तरदिरंगाई थांबून कामगारांना खऱ्या अर्थाने न्याय मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.



