बबन शिंदे यांच्या विषयीची नाराजी कोणाच्या पथ्यावर ; इच्छुकांची मोर्चेबांधणी सुरू, शिवतेजसिंह मोहिते पाटील यांना माढा विधानसभा लढवण्याचा आग्रह
महर्षि डिजीटल न्यूज / सागर खरात
टेंभुर्णी : लोकसभेचा निकाल लागून एक महिना पूर्ण होतो तोपर्यंत विधानसभा निवडणुकांची मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. माढा विधानसभा मतदारसंघातही अनेक इच्छुकांनी चाचपणी सुरू केली असून विद्यमान आमदार बबन शिंदे यांच्या विषयीची नाराजी कोणाच्या पत्त्यावर पडणार याविषयीची चर्चा सुरू असतानाच शिवतेजसिंह मोहिते पाटील यांच्या नावाचा आग्रह होताना दिसत आहे.
साखर कारखानदारीच्या भरवशावर गेले अनेक वर्ष माढा विधानसभेवर निवडून येणारे बबनराव शिंदे यावेळी मात्र पिछाडीवर पडल्याचे लोकसभेच्या निकालावरून दिसून आले आहे. त्यामुळे माढा तालुका विकासाच्या बाबतीतही कोसो दूर असल्याने त्यांच्याविषयीची नाराजी आता उघडपणे चर्चिली जाऊ लागली आहे. अशातच येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांना पर्याय म्हणून अनेकांनी गुडघ्याला बाशिंग बांधल्याचेही दिसून येत आहे.
शिवाजी सावंत, मीनल साठे, शिवाजी राजे कांबळे, संजय कोकाटे, भारत पाटील, नितीन कापसे, संजय पाटील घाटणेकर या नेत्यांनी चाचपणी सुरू केली असल्याची चर्चा रंगत असली तरी आ.बबन शिंदे यांना कडवे आव्हान देऊन त्यांच्या विरोधात निवडून येण्याच्या क्षमते बाबत मात्र शंका उपस्थित केली जात आहे. शिवाय यावेळी बबन शिंदे निवडणूक लढवणार की त्यांचे सुपुत्र रणजीत शिंदे यांना संधी देणार याबाबतही तर्कवतर्क लढवले जाऊ लागले आहेत.
अशातच लोकसभा निवडणुकांच्या निमित्ताने गेल्या वर्षभरापासून माढा विधानसभा मतदारसंघ पिंजून काढणारे व प्रत्येक गावात जाऊन स्थानिक नेते व कार्यकर्त्यांशी नाळ जोडलेले शिवतेजसिंह मोहिते पाटील शिंदे पिता पुत्रा विरोधात सक्षम पर्याय ठरतील अशीही चर्चा रंगू लागली आहे. मनमोकळा स्वभाव नागरिकात मिसळून त्यांच्याबरोबर एकरूप होण्याची हातोटी यामुळे शिवतेजसिंह यांना कार्यकर्त्यांकडून गळ घातली जाऊ लागली आहे. शिवतेजसिंह मोहिते पाटील यांनी माढा विधानसभा लढविण्याबाबत अद्याप आपली भूमिका जाहीर केली नसली तरी ते काय भूमिका घेतात याकडे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.