अकलूज येथे १७ लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त; एकजण अटकेत, गोपनीय माहितीच्या आधारे अकलूज पोलिसांची कारवाई

महर्षि डिजीटल न्यूज
अकलूज : गोपनीय माहितीच्या आधारे अकलूज पोलिसांनी केलेल्या कारवाईत तब्बल १७ लाख रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा व महिंद्राची पिकअप गाडी जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणी एका आरोपीस अटक करण्यात आली असून, अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्याच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक प्रितम यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर आणि अकलूज पोलीस ठाण्याचे निरीक्षक भानुदास निंभोरे यांच्या मार्गदर्शनाखाली २१ एप्रिल रोजी सकाळी ९ ते ११ दरम्यान अकलूज ते माळशिरस रस्त्यावर जैन मंदिराजवळ वाहतूक तपासणी मोहीम राबविण्यात आली.
दरम्यान, पोलीस अंमलदार पो.हे.कॉ. १८२७ कंटोळी, पो.ना. ९११ माने, पो.कॉ. १९४६ आत्तार आणि पो.कॉ. २०६ नदाफ हे ड्युटीवर असताना त्यांना गोपनीय माहिती मिळाली की, आरोपी आदित्य अंकुश जाधव (वय २५, रा. दहिवडी, ता. माण, जि. सातारा) हा आपल्या ताब्यातील महिंद्रा पिकअप (क्र. MH-11-DD-4390) मधून प्रतिबंधित गुटखा वाहून नेत आहे.
सदर वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये विमल पानमसाला, विमल सुगंधित तंबाखू, आर.एम.डी. पानमसाला, आर.एम.डी. सुगंधित तंबाखू व अन्य तंबाखूजन्य पदार्थ आढळून आले. या प्रतिबंधित पदार्थांची एकूण अंदाजे किंमत ९,१७,१००/- रुपये, तर वाहनाची किंमत ८,००,०००/- रुपये असून एकूण १७,१७,१००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या प्रकरणी अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त श्री. मंगेश मल्हारी लवटे यांनी दिलेल्या तक्रारीवरून अकलूज पोलीस ठाण्यात अन्न सुरक्षा व मानदे कायदा २००६ अंतर्गत कलम २६(२)(i), २६(२)(ii), २६(२)(iv), २७(३)(e), ३०(२)(a), ५९ आणि भारतीय दंड संहिता कलम २२३, २७४, २७५, १२३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर गुन्ह्याचा पुढील तपास पो.हे.कॉ. ४०९ क्षीरसागर हे करीत आहेत. प्रतिबंधित गुटख्याच्या वाहतुकीबाबत आणखी काही धागेदोरे मिळण्याची शक्यता असून पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत.



