पालखी महामार्ग अधिग्रहणातील सावळा गोंधळ ; सवतगव्हाण येथील दोन मजली इमारतीचा मोबादला देऊनही पुन्हा मुल्यांकन?

महर्षि डिजीटल न्यूज
अकलूज : माळशिरस तालुक्यातून जाणार्या संत तुकाराम महाराज पालखी महामार्गावरील अधिग्रहण अंतिम टप्प्यात येत असताना यातील सावळा गोंधळ आता समोर येऊ लागला आहे. भूसंपादनाच्या प्रक्रियेतील काही अधिकारी व कर्मचार्यांनी अनेक गोलमाल झाल्याचेही नागरीक आता उघडपणे बोलू लागले आहेत. त्यामुळे या सर्व प्रकरणाची वरीष्ठ पातळीवर चौकशी होणे गरजेचे असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
भूसंपादन अधिकारी त्याच्याकडे सार्वजनिक बांधकाम विभाग, वनिकरण विभाग, कृषि विभाग, महाराष्ट्र जिवन प्राधिकरण अशा विविध विभागांमार्फत आलेल्या मुल्यांकनाच्या आधारे संबंधितांच्या रक्कमा अदा करतात. परंतु संबंधित विभागाने केलेले मुल्यांकन कितपत योग्य आहे याची शहानिशा मात्र संत तुकाराम महाराज पालखी महार्गाच्या भूसंपादन प्रक्रियेत झालेली दिसत नाही. त्यामुळेच अनेकांना वाजवी रक्कम, अनेकांना तुटपूंजा मोबदला, अधिग्रहण झाले नसलेल्यांनाही नुकसान भरपाईच्या रकमा वितरीत झाल्या असल्याची खात्रीशिर माहिती महर्षि डिजीटल न्यूज कडे उपलब्ध झाली आहे.
यापैकी ताजे उदाहरण असलेल्या सवतगव्हाण हद्दीतील एका दोन मजली इमारतीचे यापूर्वीच मुल्यांकन होऊन त्याचा मोबदला संबंधितांना देण्यात आला आहे. तरीही भूसंपादन प्रक्रियेतील एक कर्मचारी व सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकारी यांनी संगनमताने ग्रामपंचायतीचा बोगस असीसमेंट उतारा जोडून पुन्हा त्याच इमारतीसाठी मुल्यांकन केले आहे. आता त्याचा निवाडा करण्यासाठी व पुरावा नष्ट करण्यासाठी पोलिस बंदबस्त लावून इमारत पडण्याचा प्रयत्न चालू असल्याची खात्रीशिर माहिती महर्षि डिजीटल न्यूजला मिळाली आहे.
अशा प्रकारची अनेक प्रकरणे व या प्रकरणाचा भूसंपादन कार्यालयातील मास्टर माईंड याचा पर्दाफाश करण्याचा पुढील भागापासून महर्षि डिजीटल न्यूज च्या माध्यमातून प्रयत्न केला जाणार आहे. संबंधित अधिकारी याची दखल घेऊन अशा प्रकरणात सहभागी असलेल्या मास्टर माईंड सहीत सर्वांची चौकशी करतील अशी अपेक्षा आहे. (क्रमशः)