Latest News
ठिबक सिंचन पाइपची चोरी करणारा जेरबंद, सहा गुन्ह्यांची उकल ; तब्बल २ लाख ४४ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

महर्षि डिजीटल न्यूज | सागर खरात
अकलूज : अकलूज पोलिसांनी ठिबक सिंचन पाइप चोरी प्रकरणाचा छडा लावत एका आरोपीला अटक करून सहा गुन्ह्यांची उकल केली आहे. या कारवाईत पोलिसांनी तब्बल २ लाख ४४ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला असून, अकलूज पोलिसांच्या या धडाकेबाज कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.
चौंडेश्वरवाडी (ता. माळशिरस) येथील फिर्यादी महादेव मारुती एकतपुरे यांच्या शेतातील ठिबक सिंचनाचे गुंडाळलेले पाइप दिनांक ६ मे २०२६ रोजी सकाळच्या सुमारास अज्ञात व्यक्तींनी तीनचाकी वाहनातून चोरून नेले होते. याप्रकरणी अकलूज पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३१३/२०२६, भा.न्या.सं. कलम ३०३(२) अन्वये चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्याचा तपास सुरू असताना पोलिसांनी विकास नाना उर्फ रामसाहेब चोरमले (वय २३, रा. ६९ फाटा, ता. माळशिरस) यास ताब्यात घेतले. चौकशीत आरोपीने चौंडेश्वरवाडी परिसरातील शेतांमधून ठिबक सिंचनाचे पाइप चोरी करून ते विक्रीसाठी नेत असल्याची कबुली दिली.
पोलिस तपासात आरोपीने एप्रिल २०२६ दरम्यान चौंडेश्वरवाडी परिसरातील विविध शेतकऱ्यांच्या शेतातून ठिबक सिंचन पाइप चोरी केल्याचे उघड झाले. या तपासातून अकलूज पोलीस ठाण्यातील चार, माळशिरस पोलीस ठाण्यातील एक आणि वेळापूर पोलीस ठाण्यातील एक अशा एकूण सहा गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले.
या कारवाईत पोलिसांनी चोरीस गेलेले ठिबक पाइप, चोरीसाठी वापरलेले तीनचाकी वाहन (एमएच ४५ एएन ६३०९), तसेच एका गुन्ह्यातील एचएफ डिलक्स दुचाकी आणि औषध फवारणीसाठी वापरला जाणारा एसटीपी संच असा एकूण २ लाख ४४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक प्रेरणा कट्टे, उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष वाळके आणि पोलीस निरीक्षक नीरज उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक विशाल कदम, पोलीस हवालदार विनोद साठे, अभिजित कुंभार, अमोल मिरगणे, सुनील माने आणि पंडित गवळे यांनी केली.सदर प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विशाल कदम करीत आहेत.



