Latest News

“आई-मुलीच्या जिद्दीला सलाम!” अकलूजमध्ये मायलेकीने एकाच वेळी दहावीची परीक्षा पास; आईने ३७ व्या वर्षी मिळवले यश

महर्षि डिजीटल न्यूज | सागर खरात 

अकलूज : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांच्या वतीने मार्च २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. या निकालात अकलूज येथील मायलेकीने एकाच वेळी दहावीची परीक्षा उत्तीर्ण होत जिद्द, चिकाटी आणि शिक्षणाची प्रेरणादायी कहाणी उभी केली आहे. या अनोख्या यशामुळे अकलूज परिसरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

अकलूज येथील जिजामाता कन्या प्रशालेची विद्यार्थिनी कु. लक्ष्मी नागनाथ क्षीरसागर हिने दहावीच्या परीक्षेत ५०० पैकी ४११ गुण मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले. विशेष म्हणजे तिची आई सौ. पूजा नागनाथ क्षीरसागर यांनीही वयाच्या ३७ व्या वर्षी बाह्य विद्यार्थिनी म्हणून परीक्षा देत ५०० पैकी २१८ गुण मिळवून दहावी उत्तीर्ण होण्याचा मान मिळवला.

आई आणि मुलगी दोघींनीही एकाच वेळी दहावी उत्तीर्ण झाल्याने या मायलेकीचे सर्वत्र कौतुक होत आहे. शिक्षणासाठी वय अडथळा नसते, हे सौ. पूजा क्षीरसागर यांनी आपल्या कृतीतून सिद्ध करून दाखवले आहे.

सौ. पूजा क्षीरसागर या सध्या यशवंतनगर येथील सावित्रीबाई फुले लोकसंचलित साधन केंद्राच्या २१ चारी जयसिंहनगर येथे सीआरपी पदावर कार्यरत आहेत. अपुऱ्या शिक्षणामुळे जीवनात अनेक अडचणी येत असल्याची जाणीव झाल्यानंतर त्यांनी पुन्हा शिक्षणाची वाट धरली आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर दहावीची परीक्षा उत्तीर्ण केली.

आपली मुलगी इंजिनिअर व्हावी, असे त्यांचे स्वप्न असून त्यासाठी त्या अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही अहोरात्र मेहनत घेत आहेत. मायलेकीच्या या यशामुळे अनेकांसाठी प्रेरणादायी उदाहरण निर्माण झाले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!