Latest News

देशातील सर्वोच्च नाट्य प्रशिक्षण संस्थेत प्रमिला लोदगेकर देत आहेत लावणीचे धडे ; ग्रामीण भागातील लावणी सम्राज्ञीला मिळाला बहुमान

महर्षि डिजीटल न्यूज
अकलूज : नाट्यशास्त्राचे प्रशिक्षण देणारी देशातील सर्वोच्च संस्था अर्थात नवी दिल्ली येथील नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा मध्ये विद्यार्थ्यांना लावणीचे प्रशिक्षण देण्याचा बहुमान नाट्यसंगीत अकॅडमीचा उस्ताद बिस्मिल्ला खान युवा रत्न पुरस्कार प्राप्त लावणी सम्राज्ञी प्रमिला लोदगेकर यांना मिळाला आहे. 15 दिवस विविध राज्यातील 40 विद्यार्थी विद्यार्थीनींना त्या लावणीचे प्रशिक्षण देणार आहेत.

ग्रामीण भागातून येणार्‍या प्रमिला लोदगेकर यांनी एक लावण्यवती ते लावज्ञी सम्राज्ञी पर्यंतचा प्रवास आपल्या मनमोहक कलेच्या बळावर चालू ठेवला आहे. अकलूज लावणी स्पर्धेत सलग तीन वर्ष प्रथम  क्रमांक मिळवून हॅट्रिक, अकलूज लावणी स्पर्धेचा मानाचा सहकार महर्षी शंकर राव मोहिते पाटील लावणी कलावंत पुरस्कार याचबरोबर गोवा येथे भास्कर भूषण यांचा प्राईड ऑफ इंडिया तसेच महाराष्ट्र साहित्य परिषदेचा लावणी कलावंत पुरस्कार, अखिल भारतीय नाट्य परिषदेचा ही मानाचा पुरस्कार मिळाला त्यांना मिळाला असून भारत सरकार च्या वतीने चीन  व  दुबई   येथे महाराष्ट्राची लोक कला या कार्यक्रमांमध्ये महाराष्ट्राची पारंपारिक लावणी सादर करण्याची संधीही त्यांना प्राप्त झाली आहे.

राष्ट्रीय नाट्य विद्यालय (नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा) या संस्थेने मराठी, हिंदी बरोबरच इतर विविध भाषेतील नामवंत कलाकरांना घडविले आहे. कलाकार बनवण्याची फॅक्टरी म्हणून या संस्थेकडे पाहिले जाते. देशभरातील विविध राज्यातून शेकडो विद्यार्थी येथे कलाकार बनण्याचे स्वप्न उराशी बाळगून प्रशिक्षण घेत असतात. या संस्थेच्या वतीने महाराष्ट्राचा अस्सल रांगडा तमाशा शिकवला जात असून आंतरराष्ट्रीय ख्यातीप्राप्त लोककला संशोधक तथा मुंबई विद्यापीठ लोककला अकादमीचे प्रमुख प्रा. डॉ.गणेश चंदनशिवे हि जबाबदारी पार पाडत आहेत.

तमाश प्रशिक्षण शिबीरा अंतर्गत येणार्‍या लावणी या पारंपारिक नृत्य प्रकाराचे प्रशिक्षण मोडनिंब (जि.सोलापूर) येथील नंदा प्रमिला संगीता लोदगेकर पार्टीच्या प्रमिला लोदगेकर यांच्याकडून देण्यात येत असून विद्यार्थ्यांकडूनही त्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. 15 दिवस चालणार्‍या या लावणी प्रशिक्षण शिबीरासाठी 40 विद्यार्थी विद्यार्थीनींनी सहभाग घेतला आहे.

कलाकारांना अगदी घुंगरू बांधण्यापासून ते पोशाखाच्या मूळ पध्दती, लावणी, गायन, मूळ तमाशातील नृत्य प्रकार  ढोलकी, तुणतुणे, मंजिरा इ. विशिष्ट वाद्ये यासंबंधीचे प्रशिक्षण देण्याबरोबरच गण, गवळण, बतावणी लावणी याचेही प्रशिक्षण देण्यात येत आहे. प्रशिक्षण झाल्यानंतर 4 मे रोजी सर्व कलाकार रंगमंचावर आपली कला सादर करणार आहेत.

नवी दिल्ली येथील राष्ट्रीय नाट्य विद्यालय त्यांच्याकडून देण्यात येत असलेल्या प्रशिक्षण लावणी क्षेत्रातील सर्वच कलाकारांसाठी अभिमानाची बाब असून प्रशिक्षण घेणारे विद्यार्थी, विद्यार्थीनीही प्रमिला लोदगेकर यांच्या कलेवर व त्यांच्या कडून प्रशिक्षण घेताना मंत्रमुग्ध होऊन जात आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!