दह्याच्या पाऊचमध्ये आढळल्या आळ्या ; अकलूजच्या गांधी चौकातील नामांकित हॉटेलची FDAकडून तपासणी

महर्षि डिजीटल न्यूज | सागर खरात
अकलूज : अकलूज शहरातील गांधी चौक परिसरातील मलबार हॉटेलमधून खरेदी केलेल्या २०० ग्रॅम दह्याच्या पाऊचमध्ये अळी आढळल्याची तक्रार करण्यात आली आहे. या तक्रारीची दखल घेत अन्न व औषध प्रशासनाच्या (FDA) पथकाने मलबार हॉटेलची तपासणी केली असून, संबंधित दह्याचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. हे दही IMAP डेअरी एनर्जी (ईश्वरी मिल्क अँड अॅग्रो प्रॉडक्ट), वेळापूर येथे तयार होत असल्याने संबंधित डेअरीचीही तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
अकलूज येथील अविनाश सोनवणे यांनी याबाबत अन्न व औषध प्रशासनाकडे ऑनलाइन तक्रार केली होती. तक्रारीनुसार, त्यांनी अकलूज येथील गांधी चौकातील मलबार हॉटेलमधून IMAP डेअरी एनर्जी (ईश्वरी मिल्क, वेळापूर) यांचे दही खरेदी केले होते.
तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार, मलबार हॉटेल येथून नेलेले दही त्यांच्या मातोश्री दही-भात खात असताना दह्यामध्ये अळी आढळून आली. ही बाब लक्षात येताच त्यांनी तात्काळ त्याचे फोटो काढले आणि मलबार हॉटेलच्या मालकाला दाखवले. याबाबत विचारणा केली असता, “यामध्ये आमची चूक नाही, डेअरीच्या विरोधात तक्रार करा,” असे हॉटेल मालकाकडून सांगण्यात आल्याचे तक्रारदाराने आपल्या तक्रारीत नमूद केले आहे.
या तक्रारीनंतर सहाय्यक आयुक्त साहेबराव देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी डॉ. मंगेश लवटे आणि त्यांच्या पथकाने मलबार हॉटेलची तपासणी केली. तपासणीदरम्यान संबंधित दह्याचे नमुने घेण्यात आले असून ते पुढील तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.
दरम्यान, तपासणीवेळी मलबार हॉटेलमध्येही काही त्रुटी आढळून आल्याचे अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी सांगितले. या त्रुटींबाबत प्रशासनाकडून नियमानुसार पुढील कार्यवाही केली जाणार आहे.
संबंधित दही वेळापूर येथील IMAP डेअरी एनर्जी (ईश्वरी मिल्क अँड अॅग्रो प्रॉडक्ट) येथे तयार होत असल्याने उत्पादनाच्या ठिकाणीही अन्न व औषध प्रशासनाकडून तपासणी करण्यात येणार आहे. त्यामुळे दह्यामध्ये आढळल्याचा दावा करण्यात आलेली अळी नेमकी कशी आली, तसेच दह्याच्या गुणवत्तेबाबत काही त्रुटी आहेत का, हे प्रयोगशाळेच्या अहवालानंतरच स्पष्ट होणार आहे.
दरम्यान, या प्रकरणात तक्रारदाराने केलेले आरोप आणि प्रत्यक्ष तपासणीत समोर आलेल्या बाबी याबाबत संबंधित प्रशासनाकडून करण्यात येणारी पुढील कार्यवाही महत्त्वाची ठरणार आहे.



