कर्जमाफीसाठी QR स्कॅन करा ; आ.रोहित पवार यांच्या अन्नत्याग आंदोलनाला पाठिंबा देण्याचे आवाहन

महर्षि डिजीटल न्यूज | सागर खरात
पंढरपूर : राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी न्याय मिळावा, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी ‘अन्नदात्यासाठी अन्नत्याग’ आंदोलनाची हाक दिली आहे. येत्या १२ जून २०२६ रोजी पंढरपूर येथे हे आंदोलन सुरू होणार असून, राज्यभरातील शेतकरी व नागरिकांनी या आंदोलनाला पाठिंबा द्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर प्रसारित करण्यात आलेल्या आवाहन पत्रकात शेतकरी बांधवांना आणि सर्वसामान्य नागरिकांना आपला पाठिंबा नोंदविण्यासाठी QR कोड उपलब्ध करून देण्यात आला आहे. या QR कोडचे स्कॅनिंग करून अथवा संबंधित लिंकवर क्लिक करून आंदोलनाला पाठिंबा नोंदवता येणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
‘बळीराजाला ताकद देण्यासाठी आणि रोहितदादांना साथ देण्यासाठी’ या संदेशासह राज्यातील शेतकऱ्यांना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शेतकऱ्यांवरील वाढते कर्ज, कर्जमाफीतील अटी-शर्ती, पीकविमा आणि शेतीसंबंधित विविध प्रश्नांवर सरकारचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन महत्त्वाचे ठरणार असल्याचे आंदोलनाच्या समर्थकांकडून सांगितले जात आहे.
पंढरपूर या विठुरायाच्या नगरीत सुरू होणाऱ्या या आंदोलनाकडे राज्यातील शेतकरी, राजकीय पक्ष तसेच जनसामान्यांचे लक्ष लागले आहे. आगामी काळात या आंदोलनाला किती प्रतिसाद मिळतो आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर शासनाची भूमिका काय राहते, याकडे सर्वांचे लक्ष राहणार आहे.
दरम्यान, आंदोलनाच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर ‘कर्जवसुली नकोय, कर्जमाफी हवीय’ हा संदेशही मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून शेतकरी प्रश्न पुन्हा एकदा राज्याच्या राजकीय केंद्रस्थानी येण्याची चिन्हे दिसत आहेत.



