कत्तलखान्यावर कारवाई, पण इतर अतिक्रमणांना अभय? ; मुख्याधिकाऱ्यांच्या भूमिकेवर संशयाचे सावट

महर्षि डिजीटल न्यूज | सागर खरात
अकलूज : अकलूज नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांनी अलीकडेच कत्तलखान्याविरोधात केलेल्या कारवाईमुळे संपूर्ण परिसरात मोठी चर्चा रंगली आहे. अतिक्रमणाच्या नावाखाली कत्तलखान्यावर जेसीबी चालवत मुख्याधिकाऱ्यांनी धडक कारवाई केली खरी; मात्र ही कारवाई नेमकी कोणाच्या दबावाखाली करण्यात आली, असा प्रश्न आता नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.
कत्तलखान्यावर कारवाई करून अनेकांचा रोष ओढवून घेतलेल्या मुख्याधिकाऱ्यांना अकलूजमधील इतर अतिक्रमणे दिसत नाहीत का, असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत. कारण अकलूज शहर आणि परिसरात अनेक ठिकाणी अतिक्रमणांचे जाळे पसरलेले असून त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याची भावना नागरिकांमध्ये आहे.
मिळालेल्या माहितीनुसार बायपास माळेवाडी, प्रतापसिंह चौक ओढा, प्रतापसिंह चौक, नवीन बाजारतळ, सरकारी दवाखान्यासमोरील परिसर, कब्रस्तान ओढा, अकलाई नगर, बाराभाई गट, पंचशील नगर अड्ड्याजवळ तसेच महाराणा प्रतापसिंह चौक या भागांमध्ये विविध प्रकारची अतिक्रमणे असल्याचे दिसून येत आहे.
यातील काही ठिकाणी अतिक्रमणांमुळे वाहतूक कोंडीची समस्या गंभीर बनली असून वाहनचालकांना दररोज मनस्ताप सहन करावा लागत आहे. मात्र अशा अतिक्रमणांवर कारवाई करण्याऐवजी मुख्याधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे का, की काही राजकीय व्यक्तींच्या दबावापुढे झुकत आहे, अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरू झाली आहे.
दरम्यान, कत्तलखान्यावरील कारवाईनंतर मुख्याधिकारी तब्बल दहा दिवस गैरहजर असल्याची चर्चा रंगल्याने संशयाला आणखी खतपाणी मिळाले आहे. या कालावधीत ते नेमके कुठे होते, याबाबतही विविध तर्क-वितर्क लढवले जात आहेत.
नगर परिषदेमार्फत काही अतिक्रमणधारकांना नोटिसा बजावण्यात आल्याचे समजते. मात्र केवळ नोटिसांपुरतीच कारवाई मर्यादित राहणार की प्रत्यक्ष अतिक्रमणांवरही जेसीबी चालवण्याचे धाडस मुख्याधिकारी दाखवणार, याकडे संपूर्ण अकलूजकरांचे लक्ष लागले आहे.
कत्तलखान्यावर कारवाई करून प्रशासनाने आपली ताकद दाखवली; आता तीच ताकद शहरातील सर्वच अतिक्रमणांवर समानपणे वापरली जाणार का, हा खरा प्रश्न असून त्याचे उत्तर येत्या काही दिवसांत मिळण्याची अपेक्षा आहे.



