हुंडाबळी प्रकरणी पतीला ७ वर्षे सश्रम कारावास; माळशिरस न्यायालयाचा निकाल, ६ जणांची निर्दोष सुटका

महर्षि डिजीटल न्यूज | सागर खरात
अकलूज : पत्नीचा छळ करून आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी माळशिरस येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपी पतीस सात वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. तर इतर पाच आरोपींची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली.
याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी जेजरथ दशरथ भालेराव (रा. ऐरोली, मुंबई) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी रविंद्र बिभीषण आढाव व इतर सात जण (रा. गट नं. २, महाळुंग, ता. माळशिरस) यांच्याविरुद्ध अकलूज पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक १७५/२०१६ अन्वये भारतीय दंड विधान कलम ४९८(अ), ३०६, ३०४(बी), ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर प्रकरणाचा तपास तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक सारंग चव्हाण यांनी करून आरोपींविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र (चार्जशीट) दाखल केले होते. या प्रकरणाची सुनावणी मा. श्री. ताम्हाणेकर, अपर जिल्हा व सत्र न्यायाधीश, माळशिरस यांच्या न्यायालयात झाली.
सुनावणीनंतर न्यायालयाने आरोपी रविंद्र बिभीषण आढाव यास दोषी ठरवत पुढीलप्रमाणे शिक्षा सुनावली :
कलम ४९८(अ) अंतर्गत १ वर्ष सश्रम कारावास व २ हजार रुपये दंड
कलम ३०६ अंतर्गत २ वर्षे सश्रम कारावास व ३ हजार रुपये दंड
कलम ३०४(बी) अंतर्गत ७ वर्षे सश्रम कारावास व ५ हजार रुपये दंड
दंड न भरल्यास अतिरिक्त कारावासाची शिक्षाही सुनावण्यात आली आहे. तसेच आरोपी क्रमांक २ ते ६ यांची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली.
या प्रकरणात उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष वाळके, पोलीस निरीक्षक निरज उबाळे यांनी मार्गदर्शन केले. सरकारी पक्षातर्फे अॅड. संग्राम एस. पाटील यांनी काम पाहिले. तसेच कोर्ट पैरवी अधिकारी पोसई विजय जाधव, पोलीस हवालदार रियाज तांबोळी व हरीष भोसले यांनी सहकार्य केले.



