लवंग येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज राजस्व अभियान’ उत्साहात संपन्न; शेतकऱ्यांच्या महसुली अडचणींचे तात्काळ निराकरण

महर्षि डिजीटल न्यूज | सागर खरात
लवंग : महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभाग व तहसील कार्यालय माळशिरस यांच्या वतीने लवंग मंडल विभागात गुरुवार, दि. १७ एप्रिल रोजी ‘छत्रपती शिवाजी महाराज राजस्व अभियान’ उत्साहात पार पडले. या अभियानाचे उद्घाटन पंचायत समिती माळशिरसचे सभापती दत्ता मगर, अकलूजच्या प्रांताधिकारी श्रीमती विजया पांगारकर, जिल्हा परिषद सदस्य मारुती लोंढे आणि पंचायत समिती सदस्या सौ. ऋतुजा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
या एकदिवसीय अभियानामध्ये लवंग, वाघोली, वाफेगाव, बाभूळगाव, संगम, गणेशगाव आणि तांबवे येथील शेतकऱ्यांच्या सातबारा उतारे, महसुली नोंदी व इतर प्रशासकीय अडचणींचे निवारण संबंधित तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांनी तात्काळ केले.
याशिवाय, शिधापत्रिकांतील दुरुस्त्या, नवीन शिधापत्रिकांचे वाटप, तसेच विद्यार्थ्यांना शैक्षणिक कामासाठी आवश्यक दाखले देण्यात आले. ज्येष्ठ नागरिकांसाठी एसटी पासचे वितरण देखील यावेळी करण्यात आले. त्यामुळे नागरिकांना विविध शासकीय सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध झाल्याने समाधान व्यक्त करण्यात आले.
या शिबिराला लवंग मंडल विभागातील सर्व गावांतील शेतकरी, ग्रामस्थ, विद्यार्थी व पालकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. अभियान यशस्वी करण्यासाठी मंडळाधिकारी जाधव साहेब, महसूल अधिकारी घेरडे साहेब, निकम मॅडम, क्षीरसागर साहेब, गोडसे साहेब, बोरमवाढ साहेब तसेच ग्राम महसूल अधिकारी बाळासाहेब सरवदे यांनी विशेष परिश्रम घेतले.
शिबिराच्या आयोजनासाठी लवंग ग्रामपंचायतीचे लोकनियुक्त सरपंच प्रशांत पाटील, माजी उपसरपंच सज्जन दुरापे यांच्यासह परिसरातील नागरिकांनीही सहकार्य केले.
लवंग मंडलात अशा प्रकारचे शिबिर आयोजित केल्याबद्दल उपस्थित शेतकरी व ग्रामस्थांनी महसूल विभागाबद्दल समाधान व्यक्त करत, भविष्यातही अशी शिबिरे नियमितपणे घेण्याची अपेक्षा व्यक्त केली.



