Latest News

अतिवृष्टी व गारपिटीमुळे पिकांचे मोठे नुकसान; तात्काळ नुकसान भरपाईची शिवसेनेची मागणी

महर्षि डिजीटल न्यूज | सागर खरात 

टेंभुर्णी  : माळशिरस तालुक्यासह परिसरात झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, बाधित शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी शिवसेनेच्या वतीने राज्याचे फलोत्पादन व रोजगार हमी मंत्री भरत शेठ गोगावले यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.

माढा लोकसभा संपर्कप्रमुख संजय कोकाटे यांनी टेंभुर्णी येथे केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर भव्य शेतकरी मेळाव्याचे आयोजन केले होते. या कार्यक्रमास मंत्री भरत शेठ गोगावले व माढ्याचे आमदार अभिजीत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

दि. 19 मार्च 2026 रोजी माळशिरस तालुक्यातील पिलीव, निमगाव, खुडूस, अकलूज व इतर भागांत गारपिटीसह अवकाळी पाऊस झाला. यामध्ये द्राक्ष, केळी तसेच इतर फळबागांचे मोठे नुकसान झाले असून, काढणीला आलेल्या गव्हाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर महसूल प्रशासनाने तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी करण्यात आली.

तसेच, पाच महिन्यांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीदरम्यान पंचनामे होऊनही काही शेतकऱ्यांना अद्याप नुकसान भरपाई मिळालेली नसल्याने त्यांनाही त्वरित मदत देण्याची मागणी करण्यात आली. संगम, लवंग, वाफेगाव, नेवरे, वाघोली या नदीलगतच्या गावांतील शेतकऱ्यांसाठी पानंद रस्ते मंजूर करण्याचीही मागणी यावेळी करण्यात आली.

दरम्यान, देशात निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीचा फटका केळी उत्पादक शेतकऱ्यांना बसत असल्याचेही निदर्शनास आणून देण्यात आले. समुद्री मार्गाने निर्यात होणारी केळी जहाजांमध्ये अडकून पडल्याने व्यापाऱ्यांना आर्थिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. परिणामी, शेतकऱ्यांना त्यांच्या मालाचे पैसे मिळण्यात विलंब होत आहे.

या समस्येवर उपाय म्हणून साखर साठ्यावर जशा प्रकारे शासन कर्ज सुविधा उपलब्ध करून देते, त्याच धर्तीवर केळी उत्पादक व्यापाऱ्यांनाही कर्ज उपलब्ध करून द्यावे, जेणेकरून ते शेतकऱ्यांना तात्काळ पैसे देऊ शकतील, अशी मागणी करण्यात आली. अन्यथा या परिस्थितीचा गंभीर परिणाम शेतकऱ्यांवर होऊन त्यांना आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घ्यावा लागू शकतो, अशीही चिंता व्यक्त करण्यात आली.

यावेळी शिवसेनेचे ओबीसी आघाडीचे नेते बापू क्षीरसागर, राज्याध्यक्ष भीमराव भूषणर पाटील, जिल्हा उपप्रमुख दादासाहेब लोखंडे, माळशिरस तालुका उपप्रमुख तानाजीराव भोळे पाटील, शहाजी आप्पा काळे, महिला आघाडी तालुका प्रमुख नीताताई शिंदे, रोहिणी अहिरे, रूपाली जाधव, सोनाली लोखंडे, शिवदत्त भोळे पाटील आदींसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!