Latest News

अकलूज आरटीओ कार्यालयात ‘वाहतूक चिन्हे उद्यान’चे अनावरण; रस्ता सुरक्षा जनजागृतीस नवे व्यासपीठ

महर्षि डिजीटल न्यूज | सागर खरात

अकलूज : रस्ता सुरक्षा अभियान २०२६ अंतर्गत अकलूज येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात उभारण्यात आलेल्या वाहतूक चिन्हे उद्यानाचे अनावरण गुरुवार, दि. १२ मार्च २०२६ रोजी गजानन नेरपगार (प्रादेशिक परिवहन अधिकारी) यांच्या हस्ते पार पडले. हा कार्यक्रम अमरसिंह गवारे (उपप्रादेशिक परिवहन अधिकारी) यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.

अकलूज उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात तयार करण्यात आलेले हे उद्यान शिकाऊ परवाना, कायमस्वरूपी परवाना तसेच इतर कार्यालयीन कामकाजासाठी येणाऱ्या नागरिकांना रस्ता सुरक्षेविषयी सविस्तर मार्गदर्शन देण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.या उद्यानामध्ये रस्त्यावर आढळणारी बंधनकारक, इशारा देणारी आणि माहिती देणारी वाहतूक चिन्हे, रस्त्यावरील विविध प्रकारच्या खुणा, महत्त्वाचे रस्ता सुरक्षा नियम, सुरक्षित वाहनचालना करण्यासाठी आवश्यक सूचना तसेच अपघाताच्या वेळी करावयाची प्रथमोपचार पद्धत यांची माहिती प्रतीकात्मक आणि आकर्षक पद्धतीने प्रदर्शित करण्यात आली आहे.

उद्यानाच्या आकर्षक प्रवेशद्वारामुळे कार्यालयात येणारे नागरिक या माहितीपर प्रदर्शनाकडे सहज आकर्षित होत असल्याचे दिसून येते.उद्यानाच्या अनावरणप्रसंगी रस्ता सुरक्षा अभियानात सहकार्य केलेल्या तसेच उल्लेखनीय कामगिरी केलेल्या संस्था व नागरिकांचा प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.या कार्यक्रमाला सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी संभाजी गावडे,अश्विनकुमार पोंदकुले मोटार वाहन निरीक्षक सचिन झाडबुके, , तसेच सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक मयूर भोसेकर, वैभव राऊत, विविध ड्रायव्हिंग स्कूलचे संचालक व प्रशिक्षक, चालक-मालक प्रतिनिधी संघाचे पदाधिकारी तसेच नागरिक वाहनचालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये रस्ता सुरक्षेविषयी जागृती वाढावी, यासाठी अधिकाधिक शाळा व महाविद्यालयांनी आपल्या विद्यार्थ्यांना हे उद्यान दाखवावे, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अमरसिंह गवारे यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अक्षय साळुंखे यांनी तर आभार प्रदर्शन अर्चना दराडे यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!