मोहिते पाटलांनी उभे केलेल्या दगडालाही मत; उत्तमराव जानकर यांच्याबद्दल मात्र मतदार साशंक
महर्षि डिजीटल न्यूज / सागर खरात
अकलूज : माळशिरस विधानसभा मतदारसंघात मोहिते पाटलांचा प्रभाव एवढा आहे की, ते कोणत्याही उमेदवाराला पाठिंबा दिला तर मतदार त्यांना निःसंकोचपणे मतदान करण्यास तयार असतात. अनेकदा असेही बोलले जाते की, मोहिते पाटलांनी उभा केलेल्या दगडालाही मतदार आपली साथ देतील. मात्र, यंदाच्या निवडणुकीत मोहिते पाटलांनी पाठिंबा दिलेल्या उत्तमराव जानकर यांच्याबाबत मतदारांमध्ये साशंकता आहे.
जानकर यांची पूर्वीची राजकीय बाजू व पक्षांतराचा इतिहास पाहता, मतदार त्यांच्यावर विश्वास ठेवावा का, याबाबत संभ्रमात आहेत. जानकर यांनी विविध पक्षांमध्ये जाऊन आपल्या राजकीय अस्तित्वाला संजीवनी देण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यामध्ये काही प्रमाणात अपयश आलं, हे सत्य आहे. विविध पक्षांतून प्रवास केल्यामुळे त्यांच्यावर कायमच एक संशयाचे सावट राहिले आहे. त्यामुळे मोहिते पाटलांनी समर्थन दिलं असलं, तरी जानकर यांची भविष्यातील नेमकी भूमिका काय असेल आणि ते निवडून आल्यावर मतदारांशी बांधील राहतील का, याबद्दल अनेकांमध्ये प्रश्न उपस्थित झाले आहेत.
जानकर यांनी आमदारकी मिळवण्यासाठी मोहिते पाटलांशी हातमिळवणी केली असली, तरी ही साथ तात्पुरतीच असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. अनेकांचे मत असे की, जानकर यांची ही मैत्री केवळ आपल्या हितासाठी आहे, आणि निवडणुकीत यश मिळाल्यावर मोहिते पाटलांशी नाते ठेवले जाईल की नाही, याबाबत अनेकांना शंका आहे.
माळशिरस मतदारसंघातील ही मतदारांची साशंकता जानकर यांच्या विजयासाठी मोठा अडथळा ठरू शकते. मोहिते पाटलांच्या समर्थनामुळे निवडणुकीत जानकर यांना फायदा होईल का, की या साशंकतेमुळे त्यांना पराभवाचा सामना करावा लागेल, हे पाहणे रंजक ठरेल.