डिपी जळाल्याने माळेवाडी येथील नागरीक पाच दिवसांपासून अंधारात ; त्रस्त नागरीक महावितरणच्या कार्यालयासमोर आंदोलना करण्याच्या तयारीत
महर्षि डिजीटल न्यूज
अकलूज : माळशिरस तालुक्यातील आ.रणजितसिंह मोहिते-पाटील व आ.राम सातपुते महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी अर्थात महावितरण मार्फत माळशिरस तालुक्यातील अडचणी सोडवण्यासाठी शासनाकडून कोट्यावधींच्या निधीची मागणी करून निधी उपलब्धतेसाठी प्रयत्न करत असताना तालुक्यातील अधिकारी मात्र नागरीकांना जाणिवपूर्वक त्रास देण्यात कोणतीही कसर सोडताना दिसत नाही.
अनेक ठिकाणी शेतकर्यांना व सर्वसामान्य नागरिकांना विजपुरवठा खंडीत करणे, तारा तुटणे, डिपी जळणे अशा कारणांमुळे त्रास देणे चालूच आहे. याबाबत तक्रारी देण्यासाठी गेलेल्यांना अधिकारी भेटत तर नाहीतच आणि जरी भेटले तरी सकारात्मक उत्तरे दिली जात नाहीत. शिवाय वायरमन तर नियमित विज भरणार्या ग्राहकांच्या अचडणी सोडवण्याऐवजी विज चोरी करणार्यांच्या बचावासाठीच तत्पर असल्याचे अनेक नागरिक उघडपणे बोलून दाखवत आहेत.
याचे ताजे उदाहरण अकलूज नजीकच्या माळेवाडी (संजयनगर) येथे घडले आहे. गेल्या 5 ते 6 दिवसांपासून येथील डिपी जळाला असून नागरीकांनी वारंवार तक्रार देवुन विनंती करूनही ना वायरमन ने दखल घेतली ना संबंधित अधिकार्यांनी. त्यामुळे येथील नागरीक 6 दिवस झाले अंधारात असून लहान मुले व वयोवृध्दांना यामुळे त्रास सहन करावा लागत आहे. अधिकार्यांनी तात्काळ दखल घेऊन येथील डिपी दुरूस्त करून न दिल्यास येथील नागरीकांनी महावितरणच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्याची तयारी सुरू केल्याचे सांगितले जात आहे.