Latest News

माळशिरस तालुक्यातील 114 गावांपैकी 41 गावांत टंचाई सदृश्य परिस्थिती ; जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा

महर्षि डिजीटल न्युज

सोलापूर : माळशिरस तालुक्यातील 114 गावांपैकी 41 गावांत टंचाई सदृश्य परिस्थिती आहे. तरी सर्व संबंधित जिल्हा व तालुका स्तरीय यंत्रणांनी पाणी व चारा टंचाईच्या उपाययोजना राबविताना गावनिहाय काटेकोरपणे नियोजन करावे.  या कामात कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही, असे निर्देश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले.

            जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात माळशिरस तालुक्यातील टंचाईच्या परिस्थितीची माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी घेऊन मार्गदर्शक सूचना दिल्या. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब कांबळे, उपजिल्हाधिकारी महसूल अमृत नाटेकर, माळशिरस उपविभागीय अधिकारी नामदेव टिळेकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने, जिल्हा परिषदेचे जिल्हा पशुधन अधिकारी डॉ. नवनाथ नरळे, जिल्हा जलसंधारण अधिकारी दयासागर दामा,  तहसीलदार सुरेश शेजवळ, गट विकास अधिकारी विनायक गुळवे यांच्यासह संबंधित तालुका कृषी अधिकारी, पशुधन विकास अधिकारी, ग्रामीण पाणी पुरवठा अधिकारी, नगर पालिका मुख्याधिकारी, अन्य संबंधित अधिकारी उपस्थित होते.

             जिल्हाधिकारी आशीर्वाद म्हणाले की उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी व सर्व संबंधित तालुकास्तरीय यंत्रणांनी टंचाई आराखड्याचे कार्यालयात बसून नियोजन न करता प्रत्यक्ष फिल्डवर जाऊन पाहणी करावी व त्यानंतर गावनिहाय पाणी व चारा टंचाईचे माहे जून 2024 अखेरपर्यंतचे नियोजन करावे. उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांनी टंचाईच्या अनुषंगाने नियमित संबंधित यंत्रणाच्या बैठका घेऊन अत्यंत सूक्ष्मपणे नियोजन केल्यास तालुक्यातील एकाही गावाला पाण्याची कमतरता भासणार नाही. तसेच जनावरांनाही मुबलक चारा उपलब्ध राहील असे त्यांनी सांगितले.

             पाणीटंचाईच्या सर्व उपाययोजना संपल्यानंतरच टँकर सुरू करण्याचा निर्णय घ्यावा. टँकर सुरू करत असताना अगोदरच पाणी स्त्रोताची माहिती घ्यावी. टँकर सुरू करण्यास विरोध नाही परंतु टँकर सुरू करत असताना सर्व विहित नियमावलीचे पालन संबंधित तालुकास्तरीय यंत्रणांनी केले पाहिजे. जिल्हाधिकारी कार्यालयातून निवासी उपजिल्हाधिकारी व महसूल उपजिल्हाधिकारी हे जिल्ह्यातील सर्व तालुकास्तरीय यंत्रणाशी टंचाईच्या अनुषंगाने समन्वय ठेवणार आहेत. तरी या अनुषंगाने काही अडचण आल्यास त्यांच्याशी थेट संपर्क करावा अशा सूचनाही जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी दिल्या.

             टंचाईच्या पार्श्वभूमीवर  टंचाई स्त्रोताच्या ठिकाणच्या दीड किलोमीटरच्या परिसरात उपसा बंदी जाहीर केल्यानंतर, नदीत पाणी सोडताना तसेच चारा टंचाईच्या अनुषंगाने प्रशासनाने आदेश दिल्यानंतर तात्काळ पोलीस विभागाने पोलीस बंदोबस्त उपलब्ध करून द्यावा. तसेच उपरोक्त ठिकाणी कोणत्याही प्रकारच्या कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी. तर नदीत पाणी सोडल्यानंतर वीज वितरण कंपनीने आजूबाजूच्या परिसरातील वीज बंद करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी दिल्या.

           माळशिरस तालुक्यातील जलयुक्तच्या कामाबाबत जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी नाराजी व्यक्त करून जलसंधारण विभागाने यात पुढाकार घेऊन सर्व संबंधित यंत्रणांकडून कामांचे प्रस्ताव मागवून घ्यावेत व ही सर्व कामे जानेवारी 2024 अखेर सुरू होतील यासाठी प्रयत्न करावेत. तर कृषी विभागाने पोर्टल वरील शेततळ्यांचे 463 अर्जावर व ठिबक सिंचनाच्या 1200 अर्जावर त्वरित कार्यवाही करून पुढील आठ दिवसात हे कामे सुरू होतील यासाठी नियोजन करावे. तसेच जिल्हा परिषदेच्या जलसंधारण विभागाने माळशिरस तालुक्यातून जलयुक्तचे आराखडे गावनिहाय का पाठवले नाहीत याबाबत चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस द्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी दिले.

           महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतंर्गत माळशिरस तालुक्यातील यापूर्वी पडलेल्या दुष्काळी परिस्थितीत कोणत्या गावांमधून रोजगाराची मागणी झालेली होती त्याची सविस्तर माहिती घेऊन संबंधित गावामध्ये या अंतर्गत शेल्फवरील कामांची संख्या मोठ्या प्रमाणावर राहतील याबाबत दक्षता घ्यावी. रोहयो अंतर्गत पाणंद रस्त्याची कामेही प्राधान्याने प्रस्तावित करावीत. त्याप्रमाणेच माळशिरस तालुक्यातील अतिवृष्टी अनुदान, पीक विमा, पीएम किसान याचा आढावा जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी घेतला. तर उपजिल्हाधिकारी महसूल यांनी पंधरा दिवसांनी माळशिरस येथे जाऊन तालुकास्तरीय टंचाई आढावा बैठक घेऊन दिलेल्या सूचनाप्रमाणे संबंधित यंत्रणेकडून कार्यवाही झाली आहे का याचा आढावा घ्यावा असेही त्यांनी निर्देशित केले.

        यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब कांबळे व महसूल उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर यांनी टंचाईच्या अनुषंगाने तालुकास्तरीय यंत्रणेने कशा पद्धतीने उपायोजना राबवाव्यात याविषयी मार्गदर्शन केले. तर उपविभागीय अधिकारी टिळेकर यांनी माळशिरस तालुक्यातील 114 गावांपैकी 41 गावात टंचाई परिस्थिती असून 78 पाणी स्त्रोताच्या ठिकाणी पाणी उपसा बंदी लागू केल्याची माहिती दिली. गटविकास अधिकारी श्री. गुळवे यांनी सध्या भांब व पिंपरी या ठिकाणी प्रत्येकी एक प्रमाणे दोन टँकर सुरू असून मार्चमध्ये कमाल दहा टँकर लागू शकतात तर जून मध्ये टँकरची संख्या वाढू शकेल, अशी माहिती दिली. त्याप्रमाणेच पशुसंवर्धन अधिकारी डॉ. प्रवीण शिंदे यांनी तालुक्यातील चारा उपलब्धतेची माहिती देऊन गावनिहाय चारा उपलब्ध आराखडा तयार केला असल्याची माहिती दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!