डाळींब प्रक्रियेतून लघुउद्योगांची सुवर्णसंधी ; अकलूजमध्ये शेतकऱ्यांना मार्गदर्शन, कृषी उत्पन्न बाजार समितीचा उपक्रम

महर्षि डिजीटल न्यूज
अकलूज : कृषि उत्पन्न बाजार समिती, अकलूज व महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने डाळींब पीक विषयक चर्चासत्र शुक्रवार, दिनांक २७ रोजी बाजार समितीचे सभापती मदनसिंह मोहिते-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात संपन्न झाले.
या चर्चासत्रात डॉ. निलेश गायकवाड (डाळींब संशोधन केंद्र, सोलापूर) यांनी डाळींब लागवड व व्यवस्थापन, काढणीनंतरचे तंत्रज्ञान (पोस्ट-हार्वेस्ट) आणि प्रोसेसिंग यावर सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच अमोल भोंग (राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्था, पुणे) यांनी सुगी पश्चात तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मूल्यवर्धन व निर्यातवाढीच्या संधी स्पष्ट केल्या.
जागतिक स्तरावर भारत आघाडीचा डाळींब निर्यातदार असल्याने फळांना आकर्षक रंग, गोडवा आणि उत्तम चव प्राप्त होण्यासाठी कराव्या लागणाऱ्या उपाययोजना याबाबत तांत्रिक माहिती देण्यात आली. हवामान बदलाचा उत्पादनावर होणारा परिणाम लक्षात घेऊन योग्य तांत्रिक नियोजन, लागवड पद्धती, खतांचा संतुलित वापर, पाणी व्यवस्थापन आणि विविध रोगांवरील नियंत्रणात्मक उपाय यांवर मार्गदर्शन करण्यात आले.
निर्यातवृद्धीसाठी सुगीपश्चात प्रक्रिया अत्यावश्यक असल्याचे अधोरेखित करत डाळींब दाणे, रस, जॅम, स्क्वॅश, सिरप आदी उत्पादनांसह डाळींबाच्या सालीपासून सौंदर्यप्रसाधने आणि बियांपासून तेलनिर्मिती यांसारख्या लघुउद्योगांच्या संधींबाबत माहिती देण्यात आली. शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीसोबत उद्योजकतेकडेही पाऊल टाकावे, असे आवाहन वक्त्यांनी केले.
कार्यक्रमास बाजार समितीचे संचालक बाबुराव कदम, आप्पासाहेब रूपनवर, शिवाजी चव्हाण, महावीर गांधी यांच्यासह शेतकरी व व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. डाळींब पिकासंदर्भातील शंका-अडचणींवर शास्त्रज्ञांनी समर्पक उत्तरे देत मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक बाजार समितीचे सचिव राजेंद्र काकडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन आप्पासाहेब रूपनवर यांनी मानले.



