माळशिरस तालुका आरपीआय कार्यकारिणीची शनिवारी महत्त्वपूर्ण बैठक ; श्रीपूर येथे संघटनात्मक बांधणीसह आगामी आंदोलन व सामाजिक उपक्रमांच्या नियोजनावर होणार चर्चा

महर्षि डिजीटल न्यूज | सागर खरात
अकलूज : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) माळशिरस तालुका कार्यकारिणीची महत्त्वपूर्ण बैठक शनिवार, दि. २६ सप्टेंबर रोजी दुपारी १२.३० वाजता श्रीपूर येथील गणेश हॉलमध्ये आयोजित करण्यात आली आहे. पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासह आगामी आंदोलन, सामाजिक उपक्रम आणि विविध संघटनात्मक कार्यक्रमांच्या नियोजनाबाबत या बैठकीत चर्चा करण्यात येणार आहे.
बैठकीत ३ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या रिपब्लिकन पक्षाच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाचे नियोजन, तसेच १४ ऑक्टोबर रोजी सातारा येथून सुरू होणाऱ्या सामाजिक समता मार्चच्या नियोजनाबाबत चर्चा होणार आहे. १५ ऑक्टोबर रोजी सामाजिक समता क्रांती मार्चचे सोलापूर जिल्ह्यात आगमन होणार असून, त्याच्या स्वागत व नियोजनाबाबतही बैठकीत चर्चा केली जाणार आहे.
याशिवाय पक्षाची संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करणे, नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन व सत्कार, जिल्हा कार्यकारिणीत नव्याने पदाधिकाऱ्यांची नावे सुचविणे, तसेच विविध संघटनात्मक व सामाजिक विषयांवर चर्चा करण्यात येणार आहे.
या बैठकीस राज्य पदाधिकारी, पश्चिम महाराष्ट्रातील पदाधिकारी तसेच जिल्हा पदाधिकारी उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. तालुका पदाधिकारी, युवक तालुका पदाधिकारी, शहराध्यक्ष व शाखाध्यक्ष यांनी आपल्या भागातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व सदस्यांना बैठकीची माहिती देऊन मोठ्या संख्येने व वेळेवर उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
या बैठकीत पक्षाच्या आगामी वाटचालीसंदर्भात महत्त्वपूर्ण निर्णय व संघटनात्मक नियोजन करण्यात येणार असल्याचे मिलिंद सरतापे, तालुकाध्यक्ष, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले), माळशिरस तालुका आणि दशरथ नवगिरे, युवा तालुकाध्यक्ष यांनी सांगितले.



