शेतकऱ्यांच्या रस्त्यांच्या प्रश्नांसाठी माळशिरस तालुक्यात महसुल रस्ता अदालतचे आयोजन

महर्षि डिजीटल न्यूज / सागर खरात
माळशिरस : छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या रस्ते समस्यांवर तोडगा काढण्यासाठी तहसिल स्तरावर विशेष महसुल रस्ता अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनानिमित्त (17 सप्टेंबर) ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीपर्यंत (2 ऑक्टोबर) राबविण्यात येणाऱ्या या मोहिमेत शेतकऱ्यांना शेतापर्यंत पोहोचण्यासाठी आवश्यक असलेल्या रस्त्यांचा प्रश्न निकाली काढण्यावर भर दिला जाणार आहे.
ग्रामीण भागात अनेकदा शेतापर्यंत जाणारे रस्ते अडवले जाणे अथवा रस्ता उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांना न्यायालयात दाद मागावी लागते. अशा दाव्यांचा निकाल लागेपर्यंत कालावधी लांबत जातो व शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते. ही समस्या लक्षात घेऊन महसुल मंत्री यांनी रस्ते विषयक प्रकरणे जलदगतीने निकाली काढण्याचे निर्देश दिले आहेत.
त्यानुसार दिनांक 12 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 11 ते सायं. 5 वाजेपर्यंत तहसिलदार कार्यालय, माळशिरस येथे महसुल रस्ता अदालत आयोजित केली आहे. या न्यायालयात दाखल रस्ता दाव्यांवर सुनावणी होणार असून उभयपक्षी समझोता घडवून आणण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
तहसिल कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, संबंधित प्रकरणांची यादी नोटीस बोर्डावर लावण्यात आली असून पक्षकारांना वैयक्तिक नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. सर्व संबंधितांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून प्रकरणे आपसी तडजोडीने निकाली काढण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन तहसिलदार सुरेश शेजूळ यांनी केले आहे.



