उसाचा दर देताना सहकार महर्षी कमी पडणार नाही, कर्मचाऱ्यांना बोनस जाहीर ; सहकार महर्षी साखर कारखान्याचा गळीत हंगाम शुभारंभ

महर्षि डिजीटल न्यूज | सागर खरात
अकलूज : सोलापूर जिल्ह्यात निर्माण झालेली दुष्काळी परिस्थिती आणि पाण्याची उपलब्धता लक्षात घेता यंदा ऊस उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सहकारी साखर कारखान्यांना ऊस पुरवठा करणाऱ्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना शासनाने प्रतिटन एक हजार रुपये अनुदान द्यावे, अशी मागणी सहकार महर्षी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन जयसिंह मोहिते-पाटील यांनी केली.
सहकार महर्षी सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ कारखान्याचे मार्गदर्शक संचालक तथा माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या हस्ते क्रेनचे बटन दाबून करण्यात आला. यावेळी आयोजित कार्यक्रमात चेअरमन जयसिंह मोहिते-पाटील बोलत होते.
यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मदनसिंह मोहिते-पाटील, माजी आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील, संचालिका स्वरूपाराणी मोहिते-पाटील, विश्वतेजसिंह मोहिते-पाटील, उपाध्यक्ष शंकरराव माने-देशमुख, माजी उपाध्यक्ष प्रकाश पाटील, आजी-माजी संचालक, कार्यकारी संचालक सुहास यादव, अधिकारी, कर्मचारी तसेच सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रास्ताविकात कार्यकारी संचालक सुहास यादव यांनी कारखान्याने यंदाच्या गळीत हंगामासाठी निश्चित केलेले उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या दृष्टीने सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्यात आल्याचे सांगितले. हंगामात निर्धारित उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी नियोजनबद्ध पद्धतीने काम केले जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सोलापूर जिल्ह्यातील सहकारी साखर कारखान्यांमध्ये स्पर्धा वाढली असून खासगी कारखान्यांशीही स्पर्धा करावी लागत आहे. या पार्श्वभूमीवर कमीत कमी दिवसांत जास्तीत जास्त ऊस गाळप करून उत्पादन वाढविण्याच्या दृष्टीने सहकार महर्षी साखर कारखाना अत्याधुनिक करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना उसाचा दर देताना सहकार महर्षी साखर कारखाना कमी पडणार नाही, अशी ग्वाही जयसिंह मोहिते-पाटील यांनी दिली.
दरम्यान, कारखान्यातील कर्मचाऱ्यांसाठी त्यांनी ११ टक्के दिवाळी बोनस जाहीर केला.
यावेळी माजी आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी धरणातील पाणीसाठ्याच्या सद्यस्थितीची माहिती देत उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन केले.
यंदा दुष्काळी परिस्थितीमुळे धरणात पाणीसाठा कमी आहे. त्यामुळे रब्बी हंगामासाठी केवळ दोन पाणी मिळण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत सध्या खरीप पिकांना दुसरे पाणी दिल्यास उन्हाळ्यात कालव्याला पाणी शिल्लक राहणार नाही. परिणामी उन्हाळी पिकांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे, असे त्यांनी सांगितले.
उन्हाळ्यात पाणी उपलब्ध झाले नाही तर ऊस पीक जगवणे कठीण होईल. त्याचा परिणाम पुढील वर्षीच्या ऊस उपलब्धतेवर होऊन साखर कारखान्यांनाही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी उपलब्ध पाण्याचा विचारपूर्वक आणि काटकसरीने वापर करावा, असे आवाहन रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी केले.
गळीत हंगामाच्या शुभारंभापूर्वी सकाळी कारखान्याच्या डिस्टलरी उत्पादनाचा शुभारंभ संचालिका स्वरूपाराणी मोहिते-पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी आयोजित सत्यनारायण पूजेचा धार्मिक विधी संचालक जयदीप एकतपुरे व त्यांच्या पत्नी सौ. शीतल एकतपुरे यांच्या हस्ते पार पडला.
कार्यक्रमात माजी उपाध्यक्ष प्रकाश पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले. कारखान्याच्या गळीत हंगामासाठी अधिकारी, कर्मचारी आणि सभासदांनी एकजुटीने काम करून निर्धारित उद्दिष्ट साध्य करण्याचा निर्धार व्यक्त केला.



