Latest News

नातीच्या ताब्यावरून वाद अन् बाप झाला हैवान ; जन्मदात्या बापाकडूनच पोटच्या मुलाचा खून

महर्षि डिजीटल न्यूज | सागर खरात

अकलूज : जमीन विक्रीच्या कारणावरून सुरू असलेला कौटुंबिक वाद आणि नातीच्या ताब्यावरून झालेल्या तीव्र वादातून जन्मदात्या पित्यानेच आपल्या पोटच्या मुलाचा काठीने मारहाण करून खून केल्याची धक्कादायक घटना माळशिरस तालुक्यातील निमगाव येथे घडली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून नातेसंबंधांना काळिमा फासणाऱ्या या घटनेची सर्वत्र चर्चा सुरू आहे.

या घटनेत नितीन अंकुश राऊत (वय ४०) यांचा मृत्यू झाला असून, अंकुश राऊत (वय ६१) यांना वेळापूर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी मयताची आई विमल राऊत यांनी वेळापूर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत नितीन राऊत याला दारूचे व्यसन होते. यामुळे त्याचे वडील अंकुश राऊत यांच्याशी नेहमीच वाद होत असत. गेल्या १० ते १२ वर्षांपासून नितीन हा तासगाव येथे स्वतंत्र राहत होता. दरम्यान, त्याची दहावीत शिकणारी मुलगी शीतल ही निमगाव येथे आजोबा अंकुश राऊत यांच्याकडे राहत होती.

नातीच्या शिक्षणाचा आणि भवितव्याचा विचार करून तिला वडिलांकडे पाठविण्यास आजोबा तयार नसल्याचे समोर आले आहे. याच मुद्द्यावरून कुटुंबात दीर्घकाळ तणाव निर्माण झाला होता.

रविवारी (दि. ७ जून) सायंकाळी सुमारे ६ वाजण्याच्या सुमारास निमगाव येथे नितीन आणि त्याचे वडील अंकुश राऊत यांच्यात जोरदार शाब्दिक वाद झाला. जमीन विक्री तसेच मुलीच्या ताब्याच्या मुद्द्यावरून दोघांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले.

यावेळी नितीनने वडिलांना, “तू माझे आयुष्य उद्ध्वस्त केलेस, माझे वाटोळे केलेस,” असे म्हणत जाब विचारल्याचे सांगितले जाते. या बोलण्याचा राग आल्याने संतप्त झालेल्या अंकुश राऊत यांनी जवळील काठी उचलून नितीनच्या डोक्यावर आणि तोंडावर जोरदार प्रहार केल्याचा आरोप आहे.

मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या नितीन राऊत यांना उपचारासाठी नेण्याची तयारी सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच वेळापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. त्यानंतर आरोपी अंकुश राऊत यांना ताब्यात घेण्यात आले.

वडिलांच्या हातूनच मुलाचा मृत्यू झाल्याची घटना निमगावसह संपूर्ण परिसरात चर्चेचा विषय ठरली आहे. कौटुंबिक वाद, जमिनीचे प्रश्न आणि मुलीच्या ताब्याच्या संघर्षातून घडलेल्या या घटनेमुळे नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. वेळापूर पोलिस पुढील तपास करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!