Latest News

मावा बनविण्याचा अड्डा उद्ध्वस्त; १.९१ लाखांचा मुद्देमाल जप्त, दोघांना अटक, अकलूज मध्ये FDA ची धडक कारवाई 

महर्षि डिजीटल न्यूज | सागर खरात 

अकलूज : महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासन (FDA) च्या पथकाने अकलूजमध्ये पहाटे धडक कारवाई करत प्रतिबंधित मावा निर्मिती आणि विक्री करणारा अड्डा उद्ध्वस्त केला. या कारवाईत तब्बल १ लाख ९१ हजार रुपयांचा प्रतिबंधित अन्नपदार्थांचा साठा तसेच मावा तयार करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या दोन इलेक्ट्रिक मशीन जप्त करण्यात आल्या असून, संबंधित दोन दुकानगाळे सील करण्यात आले आहेत. याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे.

अन्न व औषध प्रशासन, सोलापूर कार्यालयाचे अन्न सुरक्षा अधिकारी डॉ. मंगेश लवटे यांनी मंगळवारी (दि. २ जून २०२६) सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास अकलूज येथील गांधी चौकातील जुन्या पोलीस स्टेशनसमोरील मे. बाबा पान शॉप येथे छापा टाकला. तपासणीदरम्यान दोन गाळ्यांमधून प्रतिबंधित मावा तयार करून त्याची विक्री सुरू असल्याचे निदर्शनास आले.

या कारवाईत प्रतिबंधित अन्नपदार्थांचा मोठा साठा आणि मावा निर्मितीसाठी वापरण्यात येणारी दोन इलेक्ट्रिक यंत्रे जप्त करण्यात आली. तसेच संबंधित दोन्ही दुकानगाळे प्रशासनाने तात्काळ सील केले.

या प्रकरणी दुकान मालक हर्षद शिवाजी होनप (वय ३३, रा. अकलूज) आणि सोनू उर्फ तानाजी शिवाजी भोसले (वय ३०, रा. अकलूज, ता. माळशिरस) यांच्याविरुद्ध अकलूज पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली असून पोलिसांनी दोघांनाही अटक केली आहे.

महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली राज्यभरात भेसळ, गुटखा, मावा आणि प्रतिबंधित अन्नपदार्थांविरोधातील कारवायांना वेग आल्याचे चित्र दिसत आहे. अकलूजमधील ही कारवाई त्याच मोहिमेचा एक भाग मानली जात असून, या धडक कारवाईमुळे प्रतिबंधित पदार्थांच्या व्यवसायात गुंतलेल्या घटकांमध्ये खळबळ उडाली आहे.

मात्र, अकलूजसह संपूर्ण माळशिरस तालुक्यात मुख्य शहरांबरोबरच गल्लोगल्ली मावा, पानमसाला आणि तत्सम पदार्थांची विक्री करणारी अनेक नामांकित दुकाने वर्षानुवर्षे सुरू असल्याची चर्चा नागरिकांमध्ये नेहमीच ऐकायला मिळते. काही ठिकाणी तर प्रतिबंधित पदार्थांची विक्री उघडपणे होत असल्याचे आरोप सातत्याने केले जात असतात. अशा परिस्थितीत एखाद्या ठिकाणी कारवाई होत असताना इतर ठिकाणी सुरू असलेल्या व्यवसायांकडे दुर्लक्ष केले जात आहे का, तसेच काहींना संबंधित यंत्रणेकडून अभय दिले जात आहे का, असा प्रश्नही या निमित्ताने उपस्थित होत आहे.

विशेष म्हणजे, अकलूज, नातेपुते, वेळापूर, माळशिरस आणि तालुक्यातील इतर प्रमुख गावांमध्ये मावा व तत्सम प्रतिबंधित पदार्थांची विक्री करणाऱ्या अनेक दुकानांची माहिती सर्वसामान्य नागरिकांनाही असते. त्यामुळे कारवाई केवळ निवडक ठिकाणांपुरती मर्यादित न राहता अशा प्रकारचा मावा तयार करणाऱ्या आणि विक्री करणाऱ्या सर्वच पानटपऱ्या, दुकानांची व्यापक तपासणी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

FDAच्या अलीकडील धडक कारवायांमुळे सर्वसामान्यांमध्ये आशा निर्माण झाली असली तरी संपूर्ण माळशिरस तालुक्यात प्रतिबंधित पदार्थांच्या विक्रीविरोधात सातत्यपूर्ण आणि व्यापक मोहीम राबविण्याची गरज व्यक्त होत आहे. अन्यथा काही दिवसांची कारवाई आणि नंतर पुन्हा जैसे थे परिस्थिती निर्माण होण्याची भीती नागरिक व्यक्त करत आहेत.

अन्न व्यवसायिकांनी अन्न व औषध प्रशासनाचा अधिकृत परवाना घेऊनच व्यवसाय करावा. तसेच गुटखा, मावा, पानमसाला, सुगंधित तंबाखू यांसारख्या प्रतिबंधित पदार्थांची विक्री आपल्या आस्थापनातून होणार नाही याची दक्षता घ्यावी. सुरक्षित व निर्भेळ अन्नपदार्थांचा पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ मधील सर्व तरतुदींचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन सहाय्यक आयुक्त साहेबराव देसाई, सहाय्यक आयुक्त सुनिल जिंतूरकर आणि अन्न सुरक्षा अधिकारी डॉ. मंगेश लवटे यांनी केले आहे.

सुरक्षित व निर्भेळ अन्नपदार्थांच्या पुरवठ्याबाबत नागरिकांच्या तक्रारी असल्यास त्यांनी fdasolapur@gmail.com या ई-मेलवर संपर्क साधावा, असे आवाहनही डॉ. मंगेश लवटे यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!