जलजीवन मिशनच्या कामांना गती? कंत्राटदारांच्या थकीत देयकांवर मंत्रालयात सकारात्मक चर्चा

महर्षि डिजीटल न्यूज | सागर खरात
अकलूज : जलजीवन मिशन अंतर्गत काम करणाऱ्या विकासक व कंत्राटदारांच्या प्रलंबित देयकांसह विविध महत्त्वाच्या प्रश्नांवर राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री नामदार गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत मंत्रालयात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. मंगळवार, दि. २८ एप्रिल २०२६ रोजी मंत्री दालनात झालेल्या या बैठकीत संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी, महाराष्ट्र राज्य पाणीपुरवठा कंत्राटदार संघटनेचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मागील तीन महिन्यांपासून संघटनेकडून बैठकीसाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात येत होता. या प्रयत्नांची दखल घेत मंत्री गुलाबराव पाटील यांनी तातडीने बैठक आयोजित करून कंत्राटदारांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर सविस्तर चर्चा केली. बैठकीदरम्यान कंत्राटदारांच्या बिलातून ‘लोकवर्गणी’च्या नावाखाली होत असलेल्या १० टक्के कपातीचा मुद्दा प्रमुख ठरला. याबाबत संबंधित प्रस्ताव नियोजन व अर्थ विभागाकडे सादर करण्यात आला असून, कॅबिनेट मान्यतेनंतर शासनच हा आर्थिक भार उचलणार असल्याचे मंत्री महोदयांनी स्पष्ट केले.
याशिवाय बयाना व डिपॉझिट रक्कम परत मिळण्याबाबतही सकारात्मक भूमिका दर्शविण्यात आली असून, यासाठी आवश्यक मंजुरी घेऊन योग्य निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी सांगितले. जिल्हा परिषद व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कामांमधील मुदतींच्या विसंगतीबाबत कंत्राटदारांनी अडचणी मांडल्या. केंद्र शासनाने २०२८ पर्यंत दिलेल्या मुदतवाढीच्या धर्तीवर जिल्हा परिषदांच्या सर्व कामांना विनादंड मुदतवाढ देण्याची मागणी करण्यात आली. यावर मंत्री महोदयांनी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक कार्यवाहीचे निर्देश दिले.
ग्रामपंचायतींना वीज कनेक्शनसाठी निधी उपलब्ध नसल्याचा मुद्दाही बैठकीत उपस्थित करण्यात आला. यावर जिल्हास्तरावर डीपीडीसीच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून घेण्याचा सल्ला देत, पालकमंत्र्यांमार्फत पाठपुरावा करण्याचे आवाहन मंत्री पाटील यांनी केले. तसेच केंद्र शासनाकडून सुमारे १५ हजार कोटी रुपयांचा निधी मिळवण्यासाठी संयुक्त प्रयत्न करण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली.
ही बैठक यशस्वी करण्यासाठी महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाचे राज्य अध्यक्ष इंजि. मिलिंद भोसले तसेच पाणीपुरवठा कंत्राटदार संघटनेचे संचालक शरदराव पाटील यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. बैठकीस राज्यभरातील कंत्राटदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये आनंद तोडकरी, शरद पाटील, बालाजी नाईक, वीरेंद्र जाधव, समीर देशमुख, हसन पटेल, विवेक राठोड, समीर शेख आणि पी. बी. तिडके यांचा समावेश होता.
या बैठकीमुळे जलजीवन मिशनअंतर्गत काम करणाऱ्या कंत्राटदारांच्या प्रलंबित प्रश्नांवर लवकरच ठोस निर्णय होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.



