सोमनाथ भोसले यांची रिपब्लिकन सेनेच्या राज्य सचिवपदी नियुक्ती ; पीपल्स रिपब्लिकन पार्टीला खिंडार

महर्षि डिजीटल न्यूज | सागर खरात
अकलूज : सोलापूर जिल्ह्यातील राजकारणात महत्त्वपूर्ण घडामोड घडत असून सामाजिक कार्यकर्ते सोमनाथ अरुण भोसले यांची रिपब्लिकन सेनेच्या फादर बॉडीच्या राज्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
पीपल्स रिपब्लिकन पार्टी (PRP) मधील युवक प्रदेशाध्यक्ष म्हणून काम पाहणाऱ्या सोमनाथ भोसले यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत पक्षाचा निरोप घेतला आणि अनेक पदाधिकाऱ्यांसह बाहेर पडले. त्यानंतर सर्वांनी रिपब्लिकन सेना पक्षात अधिकृत प्रवेश केला. हा प्रवेश सोहळा पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष सरसेनानी आनंदराज आंबेडकर, ॲड. अमन आंबेडकर तसेच प्रदेशाध्यक्ष डॉ. सुशिल सूर्यवंशी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.
सोमनाथ भोसले यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत पक्ष नेतृत्वाने त्यांच्यावर राज्य सचिवपदाची जबाबदारी सोपवली. त्यांच्या निवडीमुळे सोलापूर जिल्ह्यात रिपब्लिकन सेनेची संघटनात्मक ताकद वाढण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
नियुक्तीनंतर बोलताना भोसले यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनुसार काम करण्याचा निर्धार व्यक्त केला. “ही जबाबदारी माझ्यासाठी सन्मानासोबतच मोठे कर्तव्य आहे. समाजातील वंचित घटकांच्या न्यायहक्कांसाठी पूर्ण ताकदीने काम करणार असून सोलापूर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात रिपब्लिकन सेनेची ताकद वाढवणे हेच माझे ध्येय राहील,” असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, त्यांच्या सोबत PRP मधून बाहेर पडलेल्या अनेक पदाधिकाऱ्यांनाही लवकरच पक्षात जबाबदाऱ्या दिल्या जाणार असल्याचे संकेत देण्यात आले. या संपूर्ण घडामोडीनंतर समर्थकांनी जल्लोष करत घोषणाबाजी केली व भोसले यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला.
सोमनाथ भोसले यांच्या या नव्या राजकीय प्रवासामुळे सोलापूर जिल्ह्यातील राजकारणाला नवी दिशा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.



