Latest News

“संतांच्या शोधातून समतेचा संदेश” ; ‘जाता संतांच्या गावा’ पुस्तकाचे अकलूजमध्ये प्रकाशन

महर्षि डिजिटल न्यूज | सागर खरात

अकलूज : तरुणांनी ज्या वयात संसारात रमून निसर्गसौंदर्याचा आनंद घ्यावा, त्या वयात प्रा. स्वामीराज भिसे यांनी देशभर पायी भ्रमंती करत संतांचा शोध घेतला. त्यांच्या शांती, समता आणि बंधुतेच्या विचारांचा सार ‘जाता संतांच्या गावा’ या पुस्तकातून समाजासमोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे. आजच्या अस्थिर काळात अशा विचारांची जगाला नितांत गरज आहे, असे प्रतिपादन संत साहित्याचे अभ्यासक व माजी सनदी अधिकारी इंद्रजित देशमुख यांनी केले.

अकलूज येथील रूपा बॅकवेट हॉलमध्ये आनंदमूर्ती पब्लिकेशन आणि मराठी साहित्य परिषद, शाखा अकलूज यांच्या संयुक्त विद्यमाने प्रा. स्वामीराज भिसे लिखित ‘जाता संतांच्या गावा’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा उत्साहात पार पडला. संत साहित्याचे अभ्यासक इंद्रजित देशमुख यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संत तुकाराम महाराज संस्थान, देहूचे माजी अध्यक्ष ह.भ.प. बापूसाहेब मोरे होते.

या प्रसंगी शिवरत्न शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा शीतलदेवी मोहिते पाटील, ‘रिंगण’चे संपादक सचिन परब, भागवत धर्म प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सूर्यकांत भिसे, मराठी साहित्य परिषद शाखा अकलूजचे अध्यक्ष डॉ. विश्वनाथ आवड, तसेच आनंदमूर्ती पब्लिकेशनचे औदुंबर भिसे आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रास्ताविकात प्रा. स्वामीराज भिसे यांनी पुस्तकाची निर्मिती प्रक्रिया सांगताना महाराष्ट्र, कर्नाटक, मध्यप्रदेश, पंजाब आदी राज्यांत जाऊन संतांच्या जीवनाचा अभ्यास करताना आलेल्या अडचणींचा उल्लेख केला. मात्र या प्रवासातून मिळालेला आध्यात्मिक आनंद अविस्मरणीय असल्याचे त्यांनी नमूद केले.

शीतलदेवी मोहिते पाटील यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “आपण सर्वजण दैनंदिन जीवन जगत असलो, तरी भिसे परिवार खऱ्या अर्थाने जीवनाचा आनंद अनुभवत आहे. विविध क्षेत्रांत त्यांचे कार्य प्रेरणादायी असून भिसे परिवार म्हणजेच शिवरत्न परिवार आहे.”

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा. रोहित देशमुख यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!