Uncategorized

आमदार अभिजीत पाटील यांनी शब्द पाळला; तुळशीच्या पाणीप्रश्नावर मंत्रालयात सकारात्मक बैठक!

महर्षि डिजीटल न्यूज | सागर खरात

माढा : तुळशी (ता. माढा) येथील ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी सीना-माढा उपसा सिंचन योजनेतून पाणी मिळावे, या मागणीसाठी काही दिवसांपूर्वी आमरण उपोषण सुरू केले होते. या आंदोलनाची दखल घेत आमदार अभिजीत पाटील यांनी उपोषणस्थळी भेट देऊन ग्रामस्थांशी संवाद साधला होता. त्यानंतर त्यांनी राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करून या प्रश्नावर सकारात्मक तोडगा काढण्यासाठी बैठक घेण्याचे आश्वासन दिले होते.

त्याच अनुषंगाने मंगळवारी, दि. २२ सप्टेंबर रोजी मंत्रालय, मुंबई येथे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या दालनात तुळशीसह संबंधित गावांतील ग्रामस्थ व शेतकऱ्यांची बैठक पार पडली. बैठकीत सीना-माढा उपसा सिंचन योजनेतून संबंधित गावांना पाणी उपलब्ध करून देण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

या बैठकीत तुळशी, परितेवाडी, बावी, अंजनगाव खुर्द यांच्यासह आणखी तीन गावांचा सीना-माढा उपसा सिंचन योजनेत समावेश करून तृतीय सुधारित प्रशासकीय मान्यता अर्थात ‘सुप्रमा-३’ मंजूर करण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली.

या प्रस्तावासाठी आवश्यक असलेल्या विविध विभागांच्या मान्यता मिळाल्या असून, आता केवळ मंत्रिमंडळाच्या मंजुरीचा टप्पा बाकी असल्याचे बैठकीत सांगण्यात आले. हा विषय लवकरच मंत्रिमंडळासमोर मांडून पुढील कार्यवाही मार्गी लावण्याचे आश्वासन जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिल्याची माहिती आमदार अभिजीत पाटील यांनी दिली.

तुळशीसह संबंधित गावांतील शेतकरी व ग्रामस्थांच्या हक्काच्या पाण्यासाठी हा पाठपुरावा यापुढेही सातत्याने सुरू ठेवणार असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले. संबंधित गावांना सीना-माढा उपसा सिंचन योजनेचे पाणी मिळावे, यासाठी शासनस्तरावर आवश्यक त्या सर्व बाबींचा पाठपुरावा करून हा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी पूर्ण ताकदीने प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, तुळशीच्या पाणीप्रश्नासाठी ग्रामस्थांनी अलीकडे आंदोलनाचा मार्ग स्वीकारला होता. त्यानंतर मंत्रालयात झालेल्या या बैठकीकडे संबंधित गावांतील शेतकरी व ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button