Latest News

बैलगाडी शर्यतीचा लाडका हिंद केसरी शंभू ६५६५ काळाच्या पडद्याआड ; हजारो चाहत्यांच्या डोळ्यात पाणी

महर्षि डिजीटल न्यूज 

अकलूज : बैलगाडी शर्यतीच्या विश्वात आपल्या चपळाईने आणि कडवट झुंजारपणाने हौशी लोकांना वेड लावणारा हिंद केसरी किताब पटकावलेला निमगावचा शंभू ६५६५ हा बैल बुधवारी अचानक मरण पावला. या घटनेने माळशिरस तालुक्यातील बैलगाडी शर्यतीच्या विश्वावर शोककळा पसरली आहे. त्याच्या अंत्यविधीसाठी तब्बल चार हजार चाहत्यांनी हजेरी लावून निरोप दिला. आज (शुक्रवार) त्याचा तिसरा विधिवत करण्यात आला असून, त्यासाठीही शेकडो चाहते एकत्र जमले होते.

निमगाव ता. माळशिरस येथील अण्णा मंडले यांच्या मालकीचा हा बैल फक्त ३७ महिन्यांचा असतानाच महाराष्ट्रभर गाजला. गरीब आर्थिक परिस्थिती असूनही मंडले यांनी घरच्या गायीपासून जन्मलेल्या शंभूला जीवापाड जपले होते. २५ ते ३० मैदानांत त्याने मालकाचे नाव झळकवले. नुकताच दि. १७ ऑगस्ट रोजी माण तालुक्यातील विरकरवाडी येथील शर्यतीत त्याने हिंद केसरी हा मानाचा किताब मिळवला होता.

बैलगाडी शर्यतीतील नामवंत सावकार, बकासुर, सोन्या यांच्या बरोबर शंभू ६५६५ हे नाव गाजू लागले होते. निमगावचा भारत वळकुंडे यांचा सावकार आणि मंडले यांचा शंभू ही जोडी मैदानात आली की स्पर्धकांना जिंकण्याची आशा उरत नसे.

शंभूच्या तेजस्वी कारकीर्दीकडे पाहून त्याला तब्बल ४५ लाख रुपयांची मागणी आली होती. मात्र मालक अण्णा मंडले यांना तो विकण्याचा प्रश्नच नव्हता, कारण शंभू स्वतःही पाय खुपसून आपल्या घरीच राहायचा. प्रत्येक शर्यतीपूर्वी देवाला वंदन करण्याची त्याची सवय चाहत्यांच्या मनाला भावून जात असे.

मात्र ३ सप्टेंबर रोजी सायंकाळी अचानक रक्ताच्या उलट्या सुरू झाल्यानंतर त्याची प्रकृती खालावली. नामांकित पशुवैद्यकांकडून उपचार करूनही त्याच्या आजाराचे निदान होऊ शकले नाही. अखेर सायंकाळी ५ वाजता शंभूने आपल्या मालकाच्या घरी अखेरचा श्वास घेतला.

बातमी वाऱ्यासारखी पसरताच हजारो चाहते निमगावात धावून आले. रात्री साडेनऊ वाजता अत्यंत शोकाकुल वातावरणात त्याचा दफनविधी करण्यात आला. आज (शुक्रवार) तिसऱ्या दिवशी मंडले कुटुंबियांनी आपल्या घरासमोरच शंभूचे स्मारक उभारले

“शंभूवर आमच्या कुटुंबाने जीवापाड प्रेम केले. त्याने कधीच कुठल्याही मैदानात आमची मान खाली जाऊ दिली नाही. त्याच्या जाण्याने केवळ आमचेच नव्हे तर संपूर्ण बैलगाडी क्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे. तो आमच्या घरातीलच सदस्य होता. आजही त्याने मिळवून दिलेल्या ट्रॉफी व बक्षिसांकडे पाहिलं की, शंभूची आठवण कायम मनात राहील.”
— अण्णा मंडले, निमगाव

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!