अकलूजमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकाचा नवा लुक; उपनगराध्यक्ष शिवतेजसिंह मोहिते पाटील यांच्याकडून सामाजिक बांधिलकीचे दर्शन


महर्षि डिजीटल न्यूज | सागर खरात
अकलूज : अकलूज शहराच्या सौंदर्यात भर घालणारा आणि सामाजिक अभिमान वृद्धिंगत करणारा उपक्रम म्हणून अकलूज नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष शिवतेजसिंह मोहिते पाटील यांनी स्वखर्चातून उभारलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील अत्याधुनिक एलईडी लाईट नामफलकाचे उद्घाटन उत्साहात संपन्न झाले.
या नामफलकावर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आकर्षक फोटो व त्यांच्या स्वाक्षरीची प्रतिकृती साकारण्यात आली आहे. तसेच “आय लव डॉ.बी.आर. आंबेडकर” लिहून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून तयार करण्यात आलेला हा एलईडी फलक रात्रीच्या वेळी विशेष उठून दिसत असून, चौकाला नवा आणि आकर्षक लुक प्राप्त झाला आहे.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, समाजसुधारक व वंचितांच्या हक्कांसाठी आयुष्यभर लढणारे महान नेते होते. समानता, बंधुता आणि न्याय या मूल्यांवर आधारित समाजव्यवस्था उभी करण्यासाठी त्यांनी दिलेला लढा आजही प्रेरणादायी आहे. शिक्षणाला त्यांनी दिलेले महत्त्व आणि सामाजिक परिवर्तनासाठी केलेले कार्य हे प्रत्येक पिढीसाठी मार्गदर्शक ठरते. त्यामुळे अशा उपक्रमांमुळे त्यांच्या विचारांची जपणूक होत असून नव्या पिढीपर्यंत त्यांचा संदेश पोहोचण्यास मदत होते.
शिवाय या उपक्रमामुळे अकलूज शहराच्या सौंदर्यवृद्धीसोबतच सामाजिक ऐक्य आणि प्रेरणादायी वातावरण निर्माण झाले असल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे, हा उपक्रम पूर्णपणे स्वखर्चातून राबविण्यात आल्याने उपनगराध्यक्षांच्या सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडले.
उद्घाटन प्रसंगी नगरसेवक नाशिक सोनवणे, विशाल मोरे, विलास क्षीरसागर, प्रतिभा गायकवाड, मनीषा तिकोटे यांच्यासह विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी या उपक्रमाचे कौतुक करत भविष्यातही अशा विकासकामांची अपेक्षा व्यक्त केली.
अकलूज शहराच्या ओळखीत भर घालणारा हा एलईडी नामफलक नागरिकांसाठी प्रेरणास्थान ठरणार असून, शहराच्या विकासात अशा उपक्रमांची नितांत गरज असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.



