नवीन वर्षाचे अनोख्या पद्धतीने स्वागत ; रत्नप्रभादेवी मोहिते पाटील दिव्यांग संस्थेकडून दिव्यांग महिलेला तीन चाकी सायकल भेट

महर्षि डिजीटल न्यूज
अकलूज : नवीन वर्षाचे स्वागत जल्लोष, फटाके किंवा समारंभातून न करता सामाजिक बांधिलकी जोपासत केल्याचे एक प्रेरणादायी उदाहरण अकलूज येथे पाहायला मिळाले. रत्नप्रभादेवी मोहिते पाटील दिव्यांग सेवाभावी संस्था, विजयसिंह मोहिते पाटील दिव्यांग सेवाभावी संस्था व प्रहार संघटनेच्या संयुक्त विद्यमाने तरंगफळ (ता. माळशिरस) येथील दीव्यांग महिला जगुबाई रामहरी गेंड यांना तीन चाकी सायकल भेट देऊन नववर्षाचे आगळ्या-वेगळ्या पद्धतीने स्वागत करण्यात आले.
तरंगफळ गावच्या रहिवासी असलेल्या जगुबाई गेंड यांना दैनंदिन हालचालींसाठी मोठ्या अडचणी येत होत्या. ही बाब लक्षात घेऊन संबंधित संस्थांच्या पुढाकारातून अकलूज उपजिल्हा रुग्णालय येथे त्यांना तीन चाकी सायकल सुपूर्द करण्यात आली. या उपक्रमामुळे जगुबाई यांच्या जीवनात स्वावलंबनाचा नवा मार्ग खुला झाला असून त्यांच्या चेहऱ्यावर नववर्षाची खरी आनंदाची झळाळी दिसून आली.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस व अल्पसंख्याक विभागाचे प्रदेश प्रमुख मुख्तारभाई कोरबू, प्रहार अपंग संघटनेचे जिल्हा संघटक शहाजी देशमुख, रत्नप्रभादेवी मोहिते पाटील दिव्यांग सेवाभावी संस्था तथा विजयसिंह मोहिते पाटील दिव्यांग सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष गोरख जानकर यांची उपस्थिती लाभली. तसेच बाळासाहेब लोखंडे, अमजद शेख यांच्यासह अनेक मान्यवर, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.
यावेळी मान्यवरांनी दिव्यांग व्यक्तींना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता असल्याचे मत व्यक्त केले. गरजूंना मदतीचा हात देऊन साजरे केलेले असे सामाजिक नववर्षच खऱ्या अर्थाने प्रेरणादायी ठरते, असे प्रतिपादन उपस्थितांनी केले.
या अनोख्या व संवेदनशील उपक्रमाचे सर्व स्तरातून स्वागत होत असून, भविष्यातही अधिकाधिक दिव्यांग व्यक्तींना मदत करण्यासाठी अशा उपक्रमांची व्याप्ती वाढविण्यात येणार असल्याचा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.



