Latest News

​अकलूज पोलीस ठाण्याचं ‘नूतन’ राजकारण | भाजपशी निगडित कार्यक्षेत्राबाहेरील पाहुण्यांना मानाचा विडा का? ; चर्चेला उधाण 

​महर्षि डिजीटल न्यूज | सागर खरात

अकलूज : गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर अकलूज पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक कार्यालयाच्या नूतनीकरण केलेल्या प्रशासकीय इमारतीचा लोकार्पण सोहळा पार पडला. मात्र, या सोहळ्याने प्रशासकीय शिस्तीपेक्षा ‘राजकीय हितसंबंधांची’ चर्चाच जास्त ऐकायला मिळत आहे. एका शासकीय कार्यालयाच्या उद्घाटनासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींना डावलून, चक्क   कार्यक्षेत्राबाहेरील विशिष्ट राजकीय पक्षाशी निगडित व्यक्तींना बोलावण्यामागे पोलिसांचा नेमका हेतू काय? असा सवाल आता नागरिक विचारत आहेत.

​या नूतनीकरण केलेल्या कार्यालयाचा शुभारंभ दहिगाव (नातेपुते) येथील शिवप्रसाद उद्योग समूहाचे अध्यक्ष शरद मोरे व ऋतुजा मोरे यांच्या हस्ते सत्यनारायण महापूजा करून करण्यात आला. मुळात शरद मोरे हे भारतीय जनता पक्षाशी निगडित असल्याचे बोलले जाते. मग, अकलूजमधील स्थानिक लोकप्रतिनिधींना या कार्यक्रमाचे साधे निमंत्रण तरी दिले होते का? नातेपुतेच्या व्यावसायिकांना रेड कार्पेट का अंथरले गेले? अकलूजचे पोलीस प्रशासन सध्या भाजप नेत्यांच्या दबावाखाली काम करत आहे का? असा संशय या निमित्ताने बळावला आहे.

​पोलीस ठाण्यासारख्या संवेदनशील शासकीय इमारतीचे नूतनीकरण सरकारी निधीतून झाले की, यासाठी कोणाकडून ‘आर्थिक रसद’ पुरवण्यात आली? हा प्रश्न आता चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे. जर हे नूतनीकरण एखाद्या खासगी व्यक्तीच्या आर्थिक मदतीतून झाले असेल, तर त्या बदल्यात पोलीस प्रशासन संबंधित व्यक्तीचे ‘हित’ जपणार का? असा बोचरा प्रश्न जनसामान्यातून उपस्थित होत आहे. शासकीय कामासाठी कोणाचे आणि कोणत्या अटीवर ‘फंडिंग’ घेतले गेले, याचा खुलासा होण्याची गरज आहे.

​या सोहळ्याला पोलीस निरीक्षक नीरज उबाळे, सहायक पोलीस निरीक्षक विक्रम साळुंखे, सुधीर टेंगले, सागर कुंजीर आणि महिला पोलीस अधिकारी करिष्मा वनवे यांच्यासह संपूर्ण पोलीस फौजफाटा हजर होता. मात्र, एकाही स्थानिक लोकप्रतिनिधीची अनुपस्थिती ही पोलीस प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी असल्याची चर्चा सध्या जोर धरत आहे. शिवाय या उद्घाटना बाबत स्थानिक पत्रकारांना न कळवता कार्यक्षेत्र बाहेरील पत्रकारांकडून बातम्या लावून घेण्यात आल्या असल्याने शंका अधिकच बळावत आहे.

​थोडक्यात सांगायचे तर, नूतनीकरणामुळे कार्यालयाची चकाकी वाढली असली तरी, या वादग्रस्त सोहळ्यामुळे अकलूज पोलिसांच्या प्रतिमेला मात्र तडा गेला असल्याची चर्चा आहे. या प्रकरणावर वरिष्ठ पोलीस अधिकारी काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!