Latest News

इतके दिवस FDA झोपले होते का? कारवायांमुळे समाधान, मात्र अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

महर्षि डिजीटल न्यूज | सागर खरात

अकलूज : सोलापूर जिल्ह्यात अन्न व औषध प्रशासनाने (FDA) गेल्या काही दिवसांत धडक कारवायांची मालिका सुरू केली असून दूध डेअऱ्या, प्रतिबंधित मावा व्यवसाय, संशयित खाद्यतेल साठे आणि अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. या कारवायांचे prathamdarshni स्वागत होत असले तरी याच निमित्ताने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर अनेक प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत.

ज्या ठिकाणी कारवाई करण्यात आली, तेथील गैरप्रकार एक-दोन दिवसांत सुरू झालेले नव्हते. अनेक ठिकाणी वर्षानुवर्षे व्यवसाय सुरू असल्याची चर्चा स्थानिक पातळीवर होत होती. सर्वसामान्य नागरिकांनाही माहिती असलेले प्रकार संबंधित adhikaryanchys निदर्शनास यापूर्वी कसे आले नाहीत, असा सवाल आता उपस्थित होत आहे.

विशेष म्हणजे, माळशिरस तालुक्यासह सोलापूर जिल्ह्यात अनेक ठिकाणी अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन, प्रतिबंधित पदार्थांची विक्री, परवान्याविना सुरू असलेले व्यवसाय आणि भेसळीचे प्रकार सुरू असल्याच्या तक्रारी सातत्याने होत असतात. मग या तक्रारींवर यापूर्वी ठोस कारवाई का झाली नाही? प्रशासनाला या प्रकारांची माहिती नव्हती का? की माहिती असूनही दुर्लक्ष करण्यात आले होते? असे प्रश्न नागरिकांकडून विचारले जात आहेत.

काही नागरिकांकडून आणखी गंभीर शंकाही व्यक्त केल्या जात आहेत. अचानक सुरू झालेल्या धडक कारवाया या खरोखरच दीर्घकालीन मोहिमेचा भाग आहेत की केवळ दिखाऊ कारवाया आहेत, याबाबतही चर्चा रंगू लागल्या आहेत. त्यामुळे या मोहिमेची सातत्यता आणि निष्पक्षता सिद्ध करण्याचे आव्हान आता संबंधित विभागासमोर उभे राहिले आहे.

नागरिकांच्या मते, कारवाई केवळ छोट्या-मोठ्या दुकानदारांपुरती मर्यादित न राहता मोठ्या व्यावसायिक प्रतिष्ठानांवर, घाऊक पुरवठादारांवर आणि प्रभावशाली घटकांवरही समान निकषांवर झाली पाहिजे. अन्यथा कारवाईची निष्पक्षता आणि विश्वासार्हता याबाबत प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.

सोलापूर जिल्ह्यात सुरू झालेल्या या मोहिमेमुळे अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असले, तरी या कारवाया सर्वसमावेशक, पारदर्शक आणि सातत्यपूर्ण पद्धतीने राबवल्या गेल्या तरच त्याचा अपेक्षित परिणाम दिसून येईल. अन्यथा काही दिवसांचा गाजावाजा आणि त्यानंतर पुन्हा जैसे थे परिस्थिती निर्माण होण्याची भीतीही नागरिक व्यक्त करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!