Latest News

एका गुणाने अकलूजचा नंबर हुकला… माण तालुक्याला मिळाला प्रथम क्रमांकाचा मान

महर्षि डिजीटल न्यूज | सागर खरात 

अकलूज : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ-सुंदर बस स्थानक अभियान 2025-26 अंतर्गत अकलूज आगाराने उल्लेखनीय कामगिरी करत पुणे प्रदेशातील ‘ब’ वर्ग आगारांमध्ये द्वितीय क्रमांक पटकावला आहे. विशेष म्हणजे, अवघ्या एका गुणाने अकलूज आगाराचा प्रथम क्रमांक हुकला.

पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या पाच जिल्ह्यांतील एकूण 30 बस स्थानकांचा या स्पर्धेत समावेश होता. गतवर्षी याच अभियानात अकलूज आगाराने प्रथम क्रमांक मिळविला होता. यंदा मार्च-एप्रिल 2026 दरम्यान पार पडलेल्या अंतिम सर्वेक्षणासह चारही टप्प्यांतील सरासरी गुणांच्या आधारे 29 मे 2026 रोजी अंतिम निकाल जाहीर करण्यात आला.

या निकालानुसार अकलूज आगाराला एकूण 94 गुण मिळाले, तर प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या दहिवडी आगाराला 95 गुण प्राप्त झाले. त्यामुळे अकलूज आगाराला अवघ्या एका गुणाने प्रथम क्रमांक गमवावा लागला.

या अभियानातील विजेत्यांचा गौरव सोहळा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या 78 व्या वर्धापन दिनानिमित्त 1 जून 2026 रोजी पुणे विभागीय कार्यालयात आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्रादेशिक व्यवस्थापक अमृता ताम्हणकर आणि प्रादेशिक यंत्र अभियंता (चालन) रमेश कांबळे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, सन्मानपत्र, पुष्पगुच्छ आणि ट्रॉफी देऊन अकलूज आगाराचा सन्मान करण्यात आला.

हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी आगार व्यवस्थापक प्रमोद शिंदे तसेच अभियान कालावधीतील स्वच्छता ठेकेदार उत्तम भोसले उपस्थित होते. पुरस्कारप्राप्त ट्रॉफी आगारात आणल्यानंतर कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त स्वागत केले. या यशामुळे आगारातील अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

अकलूज आगाराच्या या यशामागे आगारातील कर्मचारी, अकलूज शहरातील व्यापारी वर्ग, विविध सामाजिक संस्था, दानशूर व्यक्ती तसेच पत्रकार बंधू यांचेही मोठे योगदान असल्याचे मानले जात आहे. बस स्थानकाची स्वच्छता, सुशोभीकरण आणि प्रवाशांसाठी आवश्यक सुविधा उभारण्यात या सर्वांनी मोलाचा सहभाग नोंदविला.

अवघ्या एका गुणाने प्रथम क्रमांक हुकला असला तरी अकलूज आगाराने सातत्यपूर्ण स्वच्छता आणि व्यवस्थापनाच्या जोरावर पुणे प्रदेशात मानाचे द्वितीय स्थान मिळवून आपली गुणवत्ता पुन्हा एकदा सिद्ध केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!