Latest News

अकलूजमध्ये अवैध कत्तलखान्यावर धाड, हृदय पिळवटून टाकणारा प्रकार उघड

महर्षि डिजीटल न्यूज | सागर खरात
अकलुज: अकलुज शहरातील पंचशीलनगर भागात बेकायदेशीरपणे गोवंश जनावरांची कत्तल करून मांस विक्री करण्याचा प्रयत्न पोलिसांनी उधळून लावला आहे. या छाप्यात पोलिसांनी सुमारे 2 लाख 71 हजार 500 रुपये किमतीचे मांस जप्त केले असून, सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी तीन संशयितांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा नोंदवला आहे.

याबाबत अकलूज पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार दिनांक 3 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी 18:00 वाजण्याच्या सुमारास अकलुज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नीरज उबाळे यांना पंचशीलनगर येथे जनावरांची कत्तल सुरू असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे त्यांनी तातडीने गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाला पाचारण केले. या पथकात पोसई कदम, पोहेकॉ पठाण, पोहेकॉ परांडे, पोहेकॉ  चव्हाण आणि पोकॉ विनोद साठे यांचा समावेश होता.

पोलीस पथकाने दोन पंचासह पंचशीलनगरमधील कबीर मोरे याच्या घराच्या मागील पत्र्याच्या शेडवर छापा टाकला. पोलीस घटनास्थळी पोहोचताच परिसरात मांस आणि रक्ताचा उग्र वास येत होता. तपासादरम्यान तेथे गोवंश जनावरांचे कापलेले मांस आढळून आले. पोलिसांनी वजनकाट्यावर मोजमाप केले असता, 150 रुपये प्रति किलो दराने विक्रीसाठी तयार केलेले एकूण 1,810 किलो मांस (किंमत 2,71,500 रुपये) मिळून आले, जे पोलिसांनी जप्त केले आहे.

छाप्यादरम्यान तेथे उपस्थित असलेला आलिम आयुब कुरेशी (वय 28) याला विचारपूस केली असता, कबीर विजय मोरे आणि अजित विजय मोरे (तिघेही राहणार पंचशीलनगर) हे देखील तेथे आले. आमच्यावर कारवाई का करता? आम्ही मांस नेऊ देणार नाही, असे म्हणत त्यांनी पोलिसांशी हुज्जत घातली आणि आरडाओरडा करून सरकारी कामात अटकाव करण्याचा प्रयत्न केला. या गोंधळाचा फायदा घेऊन आलिम कुरेशी आणि कबीर मोरे तेथून पसार झाले.

या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल विनोद अनंत साठे यांनी फिर्याद दिली आहे. यानुसार आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम 325 (दुखापत), 221 (लोकसेवकाच्या आदेशाचा अवमान), 3(5) (समान हेतू) तसेच महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम आणि प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियमाच्या विविध कठोर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास अकलुज पोलीस ठाण्याचे हेड कॉन्स्टेबल समीर लतीफ पठाण करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!