सहकार महर्षी कारखान्याच्या आधुनिकीकरणावर जयसिंह मोहिते पाटील यांचा भर; भविष्यात सभासदांना मोठा लाभ होणार

महर्षि डिजीटल न्यूज सागर खरात
अकलूज : येथील सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखान्याची 66 वी अधिमंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा कारखान्याचे चेअरमन जयसिंह मोहिते पाटील यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीत संपन्न झाली. सभेपुढील सर्वच विषयांना सभासदांनी एकमुखाने मंजुरी दिली.
सभेत कारखान्याच्या आधुनिकीकरणाचा मुद्दा केंद्रस्थानी राहिला. चेअरमन जयसिंह मोहिते पाटील यांनी साखर उद्योगासमोरील वाढती आव्हाने, कमी होत चाललेला गाळपाचा कालावधी आणि वाढता उत्पादन खर्च यावर भाष्य करत कारखान्यातील मशिनरी व बॉयलिंग हाऊसचे आधुनिकीकरण करणे ही भविष्यासाठी अत्यंत आवश्यक बाब असल्याचे स्पष्ट केले.
जयसिंह मोहिते पाटील म्हणाले, सोलापूर जिल्ह्यातील 36 पैकी 31 साखर कारखाने खाजगी आहेत. खाजगी कारखाने 50 कोटी रुपयांचा तोटाही काही प्रमाणात सहन करू शकतात; मात्र सहकारी संस्थांना एवढा तोटा पेलवणे शक्य नाही. कारखान्याचे आणि साखर उद्योगाचे अर्थकारण सक्षम ठेवण्यासाठी किमान 160 दिवस गाळप होणे आवश्यक आहे. गाळपाचा कालावधी कमी झाल्यास कारखान्याचे, साखर उद्योगाचे आणि देशाचेही मोठे नुकसान होते.
सहकार महर्षी कारखान्यातील मशिनरी तसेच बॉयलिंग हाऊसचे आधुनिकीकरण केले, तर त्याचा भविष्यात सभासदांना मोठा लाभ होणार आहे, असे जयसिंह मोहिते पाटील यांनी सांगितले. आधुनिकीकरणामुळे कमी खर्चात अधिक कार्यक्षमतेने उत्पादन घेणे शक्य होऊन कारखान्याची आर्थिक क्षमता मजबूत करण्यास मदत होणार आहे.
यावेळी संचालिका स्वरूपाराणी मोहिते पाटील यांनीही कारखान्याच्या आधुनिकीकरणाची गरज अधोरेखित केली. कारखान्याने सन 2010 मध्ये केलेल्या आधुनिकीकरणाचा भविष्यात शेतकर्यांना मोठा फायदा झाला. सध्याच्या ए.आय. तंत्रज्ञानाच्या युगात साखर उद्योगासमोरील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी कारखान्याची मशिनरी, सहवीज निर्मिती प्रकल्प तसेच डिस्टलरी प्रकल्पाचे आधुनिकीकरण करणे काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
राज्यातील साखर कारखान्यांची वाढलेली गाळप क्षमता, कमी झालेला गाळपाचा कालावधी आणि खर्च व उत्पन्नातील वाढती तफावत यामुळे साखर उद्योगासमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे. भविष्यात साखरेच्या उत्पादनाला अधिक महत्त्व प्राप्त होण्याची शक्यता असल्याने कमी खर्चात उच्च गुणवत्तेची साखर निर्माण करण्यासाठी आधुनिकीकरण हाच प्रभावी मार्ग असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या वेळी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, अकलूज बाजार समितीचे सभापती मदनसिंह मोहिते पाटील, खासदार धैर्यशील मोहिते पाटील, स्वरूपाराणी मोहिते पाटील, नगरसेवक सयाजीराजे मोहिते पाटील, व्हा. चेअरमन शंकरराव माने देशमुख, रामचंद्र सावंत पाटील, अॅड. प्रकाशराव पाटील, रावसाहेब मगर, सुभाष निंबाळकर, कार्यकारी संचालक सुहास यादव यांच्यासह कारखान्याचे आजी-माजी संचालक, विविध संस्थांचे पदाधिकारी आणि सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गतवर्षी एकरी सर्वाधिक उत्पन्न घेणार्या सभासदांना यावेळी बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच सहकार महर्षी इंजिनिअरिंग महाविद्यालयातील गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांचाही यावेळी गौरव करण्यात आला.



