FDA चा धाक, पोलिसांची ‘चांदी’! ; माळशिरस तालुक्यात गुटखा-मावा विक्रेत्यांकडून ‘अनऑफिशियल’ वसुलीचा सुळसुळाट!

महर्षि डिजीटल न्यूज | सागर खरात
तुकाराम मुंडे यांनी अन्न व भेसळ प्रतिबंधक विभागाचा कार्यभार हाती घेतल्यापासून राज्यातील विविध भागासह माळशिरस तालुक्यातही सुरू झालेल्या कारवाईनंतर दूध भेसळ, गुटखा, मावा, भेसळुक्त तेल इत्यादी सर्वांनीच त्याची दहशत घेतली आहे परंतु अकलूज, यशवंतनगरसह तालुक्याच्या विविध भागांत चोऱ्याछुप्या मार्गाने गुटखा आणि मावा विक्रीचा धंदा जोरात सुरू आहे. विशेष म्हणजे, अन्न व औषध प्रशासनाने (FDA) या अवैध धंद्यांविरुद्ध निर्माण केलेल्या दहशतीचा गैरफायदा चक्क स्थानिक पोलिसांनीच घेण्यास सुरुवात केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. गुटखा बहाद्दरांवर कारवाई करण्याऐवजी त्यांच्याकडून ‘अनऑफिशियल’ तोडपाणी करून पोलिसांचीच ‘चंगळ’ सुरू असल्याचा खळबळजनक आरोप आता होऊ लागला आहे.
मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार, तालुक्यात अनेक ठिकाणी टपऱ्या आणि पानपट्ट्यांवर छुप्या पद्धतीने मावा बनवून विकला जातो. FDA कडून कडक कारवाई होऊन गुन्हे दाखल होऊ नयेत, अशी भीती या विक्रेत्यांमध्ये आहे. मात्र, याच भीतीचा गैरफायदा घेत काही पोलीस कर्मचारी या भागात सक्रिय झाले आहेत. एखादा मावा बनवणारा किंवा गुटखा विकणारा सापडल्यास, त्याला थेट पोलीस ठाण्याची किंवा मोठ्या कारवाईची भीती दाखवली जाते.
कारवाई टाळण्यासाठी संबंधित विक्रेत्याच्या क्षमतेनुसार २,००० पासून ते थेट १०,००० पर्यंतची रोख रक्कम जागच्या जागी ‘अनऑफिशियल’ वसुली म्हणून उकळली जात आहे. म्हणजेच, शासनाचा महसूल बुडवून आणि कायद्याची पायमल्ली करून पोलिसांचे खिसे मात्र या अवैध धंद्यांमुळे गरम होत आहेत.
गुटखा आणि मावा विक्रीमुळे तरुणाई व्यसनाच्या गर्तेत ओढली जात आहे. एकीकडे वरिष्ठ पोलीस अधिकारी अमली पदार्थ आणि अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्याचे आदेश देतात; तर दुसरीकडे जमिनीवर कार्यरत असणारे काही पोलीस कर्मचारी मात्र याच अवैध धंद्यांना आपल्या कमाईचे साधन बनवत आहेत.
अकलूज आणि यशवंतनगर परिसरातील या ‘वसुली गिरी मुळे’ पोलिसांच्या खाकी वर्दीवर डाग लागत असून, या प्रकाराची उच्चस्तरीय चौकशी होणार का? आणि अशा लाचखोर पोलीस कर्मचाऱ्यांवर प्रशासन काय कारवाई करणार, याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे.



