उघडेवाडीत शेतातील पाण्याच्या वादातून सतीश माने देशमुख यांना मारहाण; आठ जणांविरुद्ध गुन्हा

महर्षि डिजीटल न्यूज | सागर खरात
अकलूज : शेतातील पाण्याचा पाठ मुजवल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून ६२ वर्षीय शेतकरी आणि त्यांच्या मुलाला काठी तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना माळशिरस तालुक्यातील उघडेवाडी येथे घडली. याप्रकरणी सतीश आनंदराव माने-देशमुख यांच्या फिर्यादीवरून आठ जणांविरुद्ध वेळापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी सतीश आनंदराव माने-देशमुख हे उघडेवाडी येथील आपल्या शेतात काम करीत असताना शेतातील पाण्याचा पाठ का मुजवला, अशी विचारणा त्यांनी संबंधित आरोपींकडे केली. त्यावेळी आरोपींनी गैरकायदेशीर जमाव करून आपल्याला काठीने तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
तसेच फिर्यादीच्या मुलालाही हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आल्याचा आरोप आहे. यावेळी आरोपींनी शिवीगाळ व दमदाटी करून ‘तुम्हाला आता जिवंत सोडणार नाही’, अशी जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीने पोलिसांना सांगितले आहे.
दरम्यान, फिर्यादीच्या हातातील सोन्याची अंगठी घेऊन गेल्याचाही आरोप करण्यात आला आहे. या घटनेनंतर सतीश माने-देशमुख यांनी वेळापूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
या प्रकरणी रवींद्र उत्तम भगत (वय ३०), विकास उत्तम भगत (वय ४०), ऋषिकेश विकास भगत (वय १९), पृथ्वीराज रवींद्र भगत (वय १८), विराज रवींद्र भगत (वय १७), हनुमंत मारुती भगत (वय ४४), बंडू मारुती भगत (वय ३५) आणि भाग्यश्री रवींद्र भगत (वय २५), सर्व रा. उघडेवाडी, ता. माळशिरस, यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) 2023 मधील कलम 115(2), 118(1), 119, 189(2), 190, 191(2), 191(3), 351(2) आणि 352 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणातील सर्व आरोपी सध्या फरार किंवा अटकेत असल्याचे नमूद नसून, अद्याप कोणालाही अटक झालेली नाही. गुन्ह्याचा पुढील तपास वेळापूर पोलिस ठाण्याचे Gpsi खंडागळे करीत आहेत.



