“अदृश्य शक्तीचा नवा संकेत? धैर्यशील मोहिते पाटील – ज्योती वाघमारे भेटीने सोलापूरच्या राजकारणात चर्चेला उधाण!”

महर्षि डिजीटल न्यूज | सागर खरात
अकलूज : सोलापूर जिल्ह्यातील विधान परिषद निवडणूक दिवसेंदिवस अधिक रंगतदार होत चालली असून या निवडणुकीने आता प्रतिष्ठेचे स्वरूप धारण केले आहे. सत्ताधारी महायुती आणि विरोधी महाविकास aaghadi या दोन्ही बाजूंनी विजयासाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू असताना, सोलापूरच्या राजकीय वर्तुळात एका भेटीने चर्चांना उधाण आले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील आणि शिवसेना (एकनाथ शिंदे गट) पक्षाच्या राज्यसभा खासदार ज्योती वाघमारे यांची झालेली भेट अनेक राजकीय तर्क-वितर्कांना जन्म देत आहे. विरोधी पक्षातील खासदार आणि सत्ताधारी पक्षातील खासदार यांच्यातील ही भेट नव्या राजकीय समीकरणांची नांदी आहे का ? याबाबत आता चर्चा सुरू झाली आहे.
विशेष म्हणजे, खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी अनेकदा आपल्या पत्रकार परिषदेमध्ये “माझ्यासोबत एक अदृश्य शक्ती आहे” असे वक्तव्य केले आहे. त्यामुळे ज्योती वाघमारे यांच्यासोबतच्या या भेटीनंतर ती “अदृश्य शक्ती” नेमकी शिवसेनेकडून तर कार्यरत नाही ना, असा प्रश्न आता राजकीय निरीक्षक उपस्थित करू लागले आहेत.
सातारा जिल्ह्यातील राजकारणात भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांच्यात निर्माण झालेल्या दुराव्याची चर्चा अद्यापही राजकीय वर्तुळात सुरू आहे. काही जाणकारांच्या मते, साताऱ्यात झालेल्या राजकीय घटनांचा वचपा काढण्यासाठी शिवसेनेला सोलापूर विधान परिषद निवडणुकीच्या माध्यमातून संधी मिळू शकते. त्यामुळे धैर्यशील मोहिते पाटील आणि ज्योती वाघमारे यांची भेट केवळ औपचारिक नसून तिच्यामागे मोठे राजकीय संकेत दडलेले असू शकतात, अशी चर्चा सुरू झाली आहे.
दुसरीकडे, भारतीय जनता पक्षाचे सोलापूरचे पालकमंत्री तथा ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनवण्याचा प्रयत्न केल्याचे बोलले जात आहे. त्यांच्या आक्रमक राजकीय भूमिकेच्या पार्श्वभूमीवर खासदार धैर्यशील मोहिते पाटील मात्र शांत, संयमी आणि नियोजनबद्ध पद्धतीने निवडणुकीची सूत्रे हाताळताना दिसत आहेत.
खा.मोहिते पाटील हे कोणत्याही प्रकारची आक्रमक वक्तव्ये टाळत विविध पक्षांच्या मतदारांशी संवाद साधत आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील सदस्य, विविध राजकीय गटांचे पदाधिकारी आणि मतदार यांच्याशी संपर्क साधून विजयाची गणिते जुळवण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे या निवडणुकीत ते केवळ पक्षीय राजकारणावर अवलंबून न राहता सर्वसमावेशक रणनीती आखत असल्याची चर्चा आहे.
सोलापूर जिल्हा हा ऐतिहासिकदृष्ट्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या विचारांचा बालेकिल्ला मानला जातो. मात्र गेल्या काही वर्षांत भारतीय जनता पक्षाने येथे आपले राजकीय अस्तित्व मजबूत केले आहे. त्यामुळे या निवडणुकीत प्रत्येक मत महत्त्वाचे ठरणार आहे.
अशा परिस्थितीत धैर्यशील मोहिते पाटील आणि ज्योती वाघमारे यांची भेट ही निवडणुकीतील सर्वात चर्चेची घटना ठरली आहे. या भेटीतून कोणते राजकीय संदेश दिले गेले, त्याचा प्रत्यक्ष परिणाम मतदानावर होणार का आणि सोलापूरच्या राजकारणात नवे समीकरण आकार घेणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
एक मात्र निश्चित आहे, सोलापूर विधान परिषद निवडणूक आता केवळ उमेदवारांची लढत राहिलेली नाही. ती प्रतिष्ठा, रणनीती, राजकीय मैत्री आणि पडद्यामागील घडामोडींची रंगतदार राजकीय लढाई बनली आहे. आणि या संपूर्ण चित्रपटातील सर्वाधिक चर्चेत असलेले पात्र म्हणून खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांचे नाव सध्या आघाडीवर असल्याचे दिसून येत आहे.



