बांधकाम कामगारांच्या योजनांचा लाभ ग्रामपंचायत स्तरावरून द्यावा – खा.धैर्यशील मोहिते-पाटील ; शिवरत्न वेल्फेअर ट्रस्टच्या वतीने बांधकाम कामगारांना गृहपयोगी वस्तू वाटपाचा विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या हस्ते शुभारंभ

महर्षि डिजीटल न्यूज
अकलूज : समाजातील सर्वात कष्टकरी वर्ग असलेल्या बांधकाम कामगारांच्या जीवनमानात बदल घडवणे हीच खरी सेवा आहे. शासनाच्या योजना गावपातळीपर्यंत पोहोचल्या पाहिजेत आणि प्रत्येक पात्र कामगाराला त्याचा हक्काचा लाभ मिळालाच पाहिजे, कामगारांच्या हितासाठी राबवल्या जाणार्या विविध शासकीय योजनांचा लाभ थेट प्रत्येक पात्र कामगारापर्यंत पोहोचावा, यासाठी ग्रामपंचायतींनाच जबाबदारी देऊन योजनांची अंमलबजावणी ग्रामपंचायत स्तरावरून करावी, अशी मागणी खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांनी केली.

शंकरनगर-अकलूज येथे शिवरत्न वेल्फेअर ट्रस्ट व महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातर्फे माळशिरस तालुक्यातील नोंदणीकृत बांधकाम कामगारांना गृहपयोगी वस्तू संच वाटपाचा शुभारंभ माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.

या प्रसंगी अकलूज बाजार समितीचे सभापती मदनसिंह मोहिते-पाटील, आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील, खासदार धैर्यशील मोहिते-पाटील, वेल्फेअर ट्रस्टच्या उपाध्यक्षा सौ. वैष्णवीदेवी मोहिते-पाटील, तालुका सुविधा अधिकारी सौ. मनीषा पवार तसेच सेवाभावी युवक, महिला आणि शेकडो कामगार उपस्थित होते.
बांधकाम कामगारांचा विकास हा फक्त वैयक्तिक पातळीवरच नव्हे तर संपूर्ण समाजाच्या प्रगतीसाठी आवश्यक आहे, या जाणिवेतून मोहिते-पाटील परिवाराने गेली अनेक वर्षे या विषयावर सातत्यपूर्ण पाठपुरावा केला आहे.
आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी सोलापूर जिल्ह्यात बांधकाम कामगारांच्या हक्कांचा मुद्दा सर्वप्रथम अधोरेखित करून त्यांना संघटित करण्याचे काम हाती घेतले.
शिवरत्न वेल्फेअर ट्रस्टच्या अध्यक्ष वैष्णवी देवी मोहिते पाटील यांनी ट्रस्ट व पंचायत समितीच्या माध्यमातून माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील व आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुमारे 3,800 पेक्षा जास्त कामगारांची नोंदणी पूर्ण करण्यात आली व त्यांना प्रत्येकी 5000 रुपयांचे अनुदान दिले. व 2200 लोकांना सुरक्षा किटचे वाटप व मजुरांच्या पाल्यांना शैक्षणिक लाभही मिळवून दिला होता. तसेच कोरोना काळातही दिवाळी साठी 5000 रुपये अनुदानाचा लाभही मजुरांना मिळाला असल्याची माहिती ट्रस्टच्या अध्यक्ष व माजी सभापती सौ.वैष्णवीदेवी मोहिते-पाटील यांनी दिली. तसेच बांधकाम कामगारांच्या नोंदणीं ग्रामपंचायत स्तरावर झाल्यास एकही कामगार वंचित राहणार नाही असेही त्या म्हणाल्या.
कोरोना महामारीच्या काळात हजारो कामगारांच्या पोटाची खळगी भरण्याचा मोठा प्रश्न उभा राहिला. त्या वेळी आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्या पुढाकाराने शासनाकडून नोंदणीकृत कामगारांना कोरोना काळात दिवाळी सणानिमित्त 5,000 रुपयांचे अनुदान देण्यात आले. यामुळे कामगार वर्गाला मोठा दिलासा मिळाला.

आता गृहपयोगी वस्तू संचाचे वाटप सुरू झाले असून, कामगारांच्या जीवनमानात थोडीशी का होईना सुधारणा घडवण्याचा हा उपक्रम आहे. ज्या नोंदणीकृत कामगारांनी मागणीचे प्रस्ताव दिले होते त्यांना संच वाटप करण्यात आले. आगामी काळात आणखी पात्र कामगारांनी नोंदणी करून घ्यावी व योजनांचा लाभ घ्यावा,असे आवाहन सौ.वैष्णवीदेवी मोहिते-पाटील व श्री.अर्जुनसिंह मोहिते-पाटील यांनी केले.
यावेळी कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या कामगारांनी समाधान व कृतज्ञता व्यक्त केली.
आमच्या सारख्या दैनंदिन मजुरी करणार्यांना सरकारच्या योजना मिळतील असे कधी वाटलेच नव्हते. आज घरात लागणार्या वस्तू मिळाल्याने मोठा दिलासा मिळाला, असे एका महिला कामगाराने सांगितले. तर दुसर्या कामगाराने मोहीते-पाटील कुटुंबाने आम्हाला केवळ मदतच केली नाही, तर आमचा आत्मविश्वास वाढवला. आता आम्हीही योजनांमध्ये सहभागी होऊन आपल्या कुटुंबाचे भविष्य घडवू शकतो, अशी प्रतिक्रिया दिली.
ही योजना फक्त वस्तूंचे वाटप नसून, कष्टकरी कामगार वर्गाच्या जीवनात आशेचा किरण आणणारी ठरत आहे. समाजातील सर्वात गरजू घटकाला आत्मविश्वास देणारा हा उपक्रम, मोहिते-पाटील परिवाराच्या संवेदनशील नेतृत्वाचे जिवंत उदाहरण ठरत आहे.




