तुमचा मोबाईल हरवला होता का? हरवलेले ३ लाखांचे १४ मोबाईल मिळाले

महर्षि डिजीटल न्यूज | सागर खरात
नातेपुते : सोलापूर ग्रामीण पोलीस दलाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या गहाळ मोबाईल शोध मोहिमेत नातेपुते पोलीस ठाण्याने उल्लेखनीय यश संपादन केले आहे. तांत्रिक तपासाच्या मदतीने तब्बल ३,००,००० रुपये किमतीचे एकूण १४ गहाळ मोबाईल शोधून काढण्यात आले असून ते संबंधित मूळ मालकांना परत करण्यात आले.
नातेपुते पोलीस ठाणे हद्दीत मोबाईल गहाळ झाल्याच्या प्राप्त तक्रारींनुसार तपासाला गती देण्यात आली होती. पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष वाळके यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक विशाल वायकर व त्यांच्या पथकाने तांत्रिक विश्लेषणाच्या साहाय्याने मोबाईलचा माग काढत ही कारवाई यशस्वी केली.
या पथकामध्ये पो.ना. लोहार, पो.ना. वाघमोडे, पो.कॉ. मदने, पो.कॉ. शिंदे तसेच इतर अंमलदारांचा समावेश होता. हस्तगत करण्यात आलेल्या मोबाईलचा कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून मूळ मालकांना स्वाधीन करण्यात आले.
या कारवाईबद्दल नागरिकांकडून पोलीस प्रशासनाचे कौतुक होत असून, मोबाईल गहाळ झाल्यास त्वरित पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन नातेपुते पोलीस ठाण्याच्या वतीने करण्यात आले आहे.



