Latest News

“जनतेचा पाठिंबा, सरकारची अडवणूक; अन्नत्याग आंदोलनावर रोहित पवारांचा एल्गार!”

महर्षि डिजीटल न्यूज | सागर खरात 

पंढरपूर : शेतकरी कर्जमाफीच्या मागणीसाठी १२ जून रोजी पंढरपुरात आयोजित करण्यात आलेल्या “अन्नदात्यासाठी अन्नत्याग” आंदोलनावरून राज्यातील राजकीय वातावरण अधिक तापले आहे. आंदोलनाला परवानगी देण्याबाबत प्रशासनाची भूमिका अद्यापही स्पष्ट नसताना आमदार रोहित पवार यांनी पुन्हा एकदा सरकारवर निशाणा साधत आंदोलन कोणत्याही परिस्थितीत होणारच असल्याचे ठामपणे जाहीर केले आहे.

सोशल मीडियावर प्रसिद्ध केलेल्या पोस्टमध्ये रोहित पवार यांनी सांगितले की, छत्रपती शिवाजी महाराज आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारक असलेल्या परिसरातच हे आंदोलन करण्याचा निर्धार करण्यात आला आहे. या आंदोलनाची माहिती मिळताच परिसरातील स्टॉलधारकांनी स्वतःहून पुढाकार घेत शेतकऱ्यांच्या हितासाठी जागा उपलब्ध करून दिली. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या शहराध्यक्षांनी केलेल्या विनंतीनंतर सर्व स्टॉलधारकांनी आंदोलनाला पाठिंबा दर्शविल्याचे त्यांनी नमूद केले.

“हीच खरी माणुसकी, महाराष्ट्र धर्म आणि शेतकऱ्यांप्रती असलेले प्रेम आहे,” असे म्हणत पवार यांनी सामान्य नागरिकांच्या संवेदनशीलतेचे कौतुक केले. त्याचवेळी त्यांनी सरकारवर टीका करत, “जी गोष्ट सामान्य जनतेला समजते ती सरकारला समजत नाही, हे दुर्दैवी आहे,” असा टोला लगावला.

कर्जमाफीच्या अटी-शर्तींचा मुद्दा उपस्थित करत पवार यांनी सरकारसमोर दोनच पर्याय असल्याचे स्पष्ट केले. “सरकारने आंदोलनाला परवानगी द्यावी किंवा कर्जमाफीवरील जाचक अटी-शर्ती तातडीने रद्द कराव्यात. अन्यथा कितीही अडथळे निर्माण केले तरी आंदोलन थांबणार नाही,” असा इशारा त्यांनी दिला.

शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळावा, यासाठी सुरू असलेला हा लढा आता केवळ आंदोलनापुरता मर्यादित न राहता सरकारच्या धोरणांविरोधातील संघर्ष बनत चालल्याचे चित्र दिसत आहे. प्रशासन आणि सरकार यांची पुढील भूमिका काय राहते, तसेच १२ जूनच्या आंदोलनाकडे सरकार कशा प्रकारे पाहते, याकडे राज्यभरातील शेतकरी आणि राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!